भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना एसआयटीचा समन्स; चौकशीमुळे अटकेची शक्यता चर्चेत
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना एसआयटीचा समन्स; चौकशीमुळे अटकेची शक्यता चर्चेत
नाशिक, प्रतिनिधी :
भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची घडामोड घडली असून विशेष तपास पथकाने (एसआयटी) राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना समन्स बजावला आहे. या समन्समुळे त्यांच्या चौकशीची प्रक्रिया सुरू होणार असून त्यानंतर अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.
अशोक खरात याच्याशी असलेल्या कथित संबंधांमुळे रुपाली चाकणकर यांना आधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी नाशिक पोलिसांची भेट घेऊन चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना सहआरोपी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे तपास यंत्रणांवर दबाव वाढल्याची चर्चा होती.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरातच्या मिरगाव येथील ‘शिवनिका संस्थान’ ट्रस्टवर सदस्य असल्याच्या पार्श्वभूमीवर चाकणकर यांना समन्स बजावण्यात आला आहे. या ट्रस्टच्या सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देताना, “समन्स बजावणे ही चौकशीची नियमित प्रक्रिया असून त्यातून कोणताही निष्कर्ष काढणे योग्य नाही,” असे सांगितले.
दुसरीकडे, रुपाली ठोंबरे पाटील यांनी गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, “कायद्यानुसार रुपाली चाकणकर या या प्रकरणात सहआरोपी ठरू शकतात. त्यांच्या भूमिकेमुळे आणि कथित संबंधांमुळे अनेक महिलांचा विश्वास वाढला आणि त्याचा गैरफायदा घेण्यात आला असण्याची शक्यता आहे.” तसेच या प्रकरणात ट्रस्टशी संबंधित सर्व व्यक्तींना सहआरोपी करण्याची मागणी त्यांनी पुन्हा केली आहे.
या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू असून पुढील काळात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत