Contact Banner

धाडसी तरुणाचा बळी; दोन चिमुरड्यांचे प्राण वाचवले, तिसरीला वाचवताना दोघेही बुडाले

 

dhadsi-tarunacha-bali-don-chimurdyanche-pran-vachavle-tisrila-vachvatana-doghehi-budale


धाडसी तरुणाचा बळी; दोन चिमुरड्यांचे प्राण वाचवले, तिसरीला वाचवताना दोघेही बुडाले

लेवाजगत न्यूज जळगाव- जिल्ह्यातील भडगाव येथे गिरणा नदीपात्रात बुडणाऱ्या मुलांना वाचवताना अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. खान नदीम खान (२५) या धाडसी तरुणाने प्रसंगावधान राखत नदीत उडी घेत दोन चिमुरड्यांचे प्राण वाचवले. मात्र तिसरी मुलगी काफिया पिंजारी (१६) हिला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना दोघेही खोल पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडले.

मिळालेल्या माहितीनुसार, काही मुले गिरणा नदीपात्रात अंघोळीसाठी गेली असताना त्यातील काहीजण खोल पाण्यात गेल्याने बुडू लागले. ही घटना लक्षात येताच जवळच असलेल्या खान नदीम खान यांनी कोणतीही पर्वा न करता नदीत उडी घेतली. त्यांनी मोठ्या धाडसाने दोन मुलांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र तिसरी मुलगी काफिया पिंजारी हिला वाचवण्यासाठी पुन्हा नदीत गेल्यानंतर दोघेही खोल पाण्यात अडकले आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.

स्थानिक नागरिकांनी या दुर्घटनेबाबत गंभीर आरोप करताना सांगितले की, गिरणा नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे अनेक ठिकाणी खोल खड्डे तयार झाले आहेत. याच खड्ड्यांमध्ये अडकून ही दुर्घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून खान नदीम खान यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.