गीतेतील तत्त्वज्ञान आचरणात आणा; जीवनातच खरा विजय — डॉ. रवींद्र भोळे
गीतेतील तत्त्वज्ञान आचरणात आणा; जीवनातच खरा विजय — डॉ. रवींद्र भोळे
उरुळी कांचन (राम मंदिर) | प्रतिनिधी
भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत मनुष्याचे कर्म आणि धर्म कसे असावे याचे सखोल विवेचन केले आहे. गीतेमध्ये परमात्मा, सृष्टी, जीव, कालचक्र आणि कर्म यांचे ब्रह्मज्ञान स्पष्ट केले असून, कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग तसेच समत्वभाव यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. गीतेतील तत्त्वज्ञान हे केवळ आध्यात्मिकच नसून मानसिक आरोग्य व उत्तम जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक शास्त्र आहे. त्यामुळे प्रत्येकाने गीतेतील तत्त्वज्ञानानुसार जीवन जगावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक व प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे यांनी केले.
येथील श्री उरुळी कांचन देवस्थान संस्था, भैरवनाथ सेवा समिती, ग्रामपंचायत उरुळी कांचन व श्रीराम जन्मोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहात त्यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. भोळे म्हणाले की, जीवनात धर्म, नीती, न्याय, विवेक, सद्बुद्धी आणि सत्य यांचे आचरण केल्यास मनुष्याचा विजय निश्चित असतो. तर अनीती, अन्याय, अधर्म आणि असत्य यांचा शेवट निश्चित आहे. भगवान श्रीकृष्णांच्या तत्त्वज्ञानाची अंमलबजावणी केल्यामुळे पांडवांचा विजय झाला, तर दुष्ट प्रवृत्तीमुळे कौरवांचा पराजय झाला, असेही त्यांनी सांगितले.
गीतेचे भक्तिभावाने चिंतन, मनन आणि अध्ययन केल्यास परमानंदाची अनुभूती येते व जीवनात दिव्यत्व प्रकट होते. जिथे धर्म असतो, तिथेच जय होतो आणि धर्मच मनुष्याचे रक्षण करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी ह.भ.प. तुकाराम कांचन, ह.भ.प. सुरेश कांचन, ह.भ.प. पुंडलिक कांचन, ह.भ.प. रोहित मुरकुटे, नाना कोंडे, प्रमिलाताई तळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीराम जन्मोत्सवानिमित्त आयोजित सप्ताहात अक्षय महाराज रोडे, नाना महाराज काळे, नीताताई महाराज कांचन, सुनिताताई महाराज कुंजीर, प्रमिलाताई महाराज तळेकर तसेच डॉ. रवींद्र भोळे महाराज यांची प्रवचने झाली. तसेच संभाजी महाराज आपुणे, डॉ. तुकाराम महाराज उराळे, सुनील महाराज शिंदे, भारतीताई महाराज गाडेकर, बाळू महाराज आहेर, गणेश महाराज भगत, शारदाताई सूर्यवंशी, गणेश महाराज पाटील, बाळकृष्ण महाराज डांगे व रमेशानंदजी महाराज जाधव यांच्या कीर्तनांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहिले होते. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत