Contact Banner

इंधन व घरगुती गॅस दरवाढीविरोधात भुसावळ शहर काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन


इंधन व घरगुती गॅस दरवाढीविरोधात भुसावळ शहर काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन


 इंधन व घरगुती गॅस दरवाढीविरोधात भुसावळ शहर काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

भुसावळ (फिरोज खान प्रतिनिधी) : देशात पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती एलपीजी गॅसच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीच्या निषेधार्थ भुसावळ शहर काँग्रेस कमिटी व भुसावळ विधानसभा युवक काँग्रेसतर्फे गुरुवारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. वाढत्या इंधन दरामुळे सर्वसामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक ताण पडत असून सरकारने तातडीने दरवाढ कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या देशभरात पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. तसेच काही ठिकाणी इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिकच कठीण झाले आहे. आधीच वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या जनतेवर इंधन दरवाढीचा मोठा आर्थिक बोजा पडत असून दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढत आहेत.

घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरामुळे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांचे घरगुती अर्थकारण पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यामुळे महागाईत मोठी भर पडून सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरांवर तात्काळ नियंत्रण आणावे, घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचे दर कमी करावेत, इंधनाचा निर्माण झालेला तुटवडा दूर करून नियमित पुरवठा सुरू करावा तसेच इंधनावरील विविध कर कमी करून महागाई नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या.

भुसावळ शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रविंद्र निकम व भुसावळ विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक रोहन राजेंद्र सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन तहसीलदारांमार्फत केंद्र व राज्य सरकारकडे पाठविण्याची मागणी करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.