Contact Banner

इंदूरमध्ये भीषण दुर्घटना : इलेक्ट्रिक कारच्या शॉर्ट सर्किटमुळे आग, ७ जणांचा मृत्यू

 

indoor-electric-car-fire-causes-death


इंदूरमध्ये भीषण दुर्घटना : इलेक्ट्रिक कारच्या शॉर्ट सर्किटमुळे आग, ७ जणांचा मृत्यू

इंदूर (मध्य प्रदेश) : शहरातील बंगाली चौकाजवळील ग्रेटर बृजेश्वरी कॉलनीत बुधवारी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास एक भीषण दुर्घटना घडली. इलेक्ट्रिक कार चार्जिंगला लावलेली असताना शॉर्ट सर्किट होऊन लागलेली आग काही क्षणांतच तीन मजली घरात पसरली. या दुर्घटनेत शहरातील एका नामांकित व्यावसायिक कुटुंबासह एकूण ७ जणांचा जळून मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, घराच्या पार्किंगमध्ये उभी असलेली इलेक्ट्रिक कार चार्जिंगला जोडलेली होती. पहाटे अचानक शॉर्ट सर्किट होऊन कारला आग लागली. ही आग वेगाने पसरत घराच्या खालच्या मजल्यावर पोहोचली आणि काही वेळातच संपूर्ण इमारतीला वेढा घातला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरामध्ये ठेवलेल्या गॅस सिलिंडर्सनाही या आगीने कवेत घेतले. काही मिनिटांतच एकामागोमाग एक सिलिंडरचे स्फोट होऊ लागले. स्फोट इतके तीव्र होते की संपूर्ण परिसर हादरून गेला. या स्फोटांमुळे घराचा एक भाग कोसळल्याचेही सांगण्यात आले आहे.

दुर्घटनेच्या वेळी घरातील सर्वजण गाढ झोपेत होते. आगीचा वेग आणि स्फोटांची तीव्रता इतकी जास्त होती की अनेकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे मृतांचा आकडा वाढल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी अपघाताचा सखोल तपास सुरू केला असून इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.