खान्देशवासीयांचे आराध्य दैवत फैजपूर खंडोबा यात्रेस उत्साहात प्रारंभ
खान्देशवासीयांचे आराध्य दैवत फैजपूर खंडोबा यात्रेस उत्साहात प्रारंभ
आज पासून भक्तांची मोठी गर्दी; प्रशासन सतर्क
फैजपूर (ता. यावल),लेवाजगत न्यूज प्रतिनिधी :
खान्देशवासीयांचे आराध्य दैवत असलेल्या फैजपूर येथील खंडोबा यात्रेस भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण प्रारंभ झाला आहे. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेपासून सुरू झालेल्या या यात्रेनिमित्त मंदिर परिसरासह संपूर्ण शहरात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आदी राज्यांतून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल होत असून परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुमारे दोनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या खंडोबा देवस्थानाची मूर्ती अत्यंत प्राचीन मानली जाते. यात्रेदरम्यान दररोज सकाळ-संध्याकाळ महाआरती, अभिषेक, कीर्तन, भजन, प्रवचन तसेच विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांच्या सोयीसाठी दर्शन रांगा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय पथक तसेच सुरक्षेची कडक व्यवस्था करण्यात आली आहे.
यात्रेचे नियोजन खंडेराव देवस्थानचे गादीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज, उत्तराधिकारी महामंडलेश्वर पवन दासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. तसेच मंदिराचे पुजारी राम मनोहर हे धार्मिक विधी पार पाडत असून संत-महंत व ग्रामस्थांच्या सहकार्याने संपूर्ण सोहळा पार पडत आहे.
यात्रेदरम्यान विविध व्यापारी स्टॉल, खेळणी, मिठाई दुकाने, महाकाय झुले, पाळणे, मौत का कुआ,संसार उपयोगी भांड्यांची दुकानें,तसेच पारंपरिक मनोरंजनाच्या साधनांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस व महसूल प्रशासनाकडून वाहतूक नियंत्रण, सुरक्षा आणि आपत्कालीन सेवांची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
यात्रोत्सव शांतता, सुव्यवस्था आणि भक्तिभावाने पार पडावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत