Contact Banner

होळीच्या रंगात रंगले पौर्णिमा दर्शन; सावदा येथील श्री स्वामिनारायण मंदिरात भाविकांची उत्स्फूर्त गर्दी


holichya-rangat-rangle-paurnima-darshan-savda-shri-swami-narayan-mandirat-bhavikanchi-utsphurt-gardi


होळीच्या रंगात रंगले पौर्णिमा दर्शन; सावदा येथील श्री स्वामिनारायण मंदिरात भाविकांची उत्स्फूर्त गर्दी

लेवाजगत न्यूज-सावदा (ता. रावेर, जि. जळगाव) :वडताल धाम अंतर्गत सावदा येथील पुरातन श्री स्वामिनारायण मंदिर सावदा येथे २ मार्च २०२६ रोजी पौर्णिमेनिमित्त विशेष दर्शन महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रहणाच्या पार्श्वभूमीवर ३ मार्चऐवजी हा सोहळा आदल्या दिवशीच आयोजित करण्यात आला होता.

पौर्णिमा निमित्त सकाळपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, आरती, भजन-कीर्तन व दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. सावदा शहरासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला.

यंदाच्या पौर्णिमा दर्शन सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे होळी सणानिमित्त करण्यात आलेली आगळीवेगळी सजावट. मंदिरातील श्री हरिकृष्ण महाराज व राधाकृष्ण देव यांच्या मूर्तींना साखरेपासून तयार केलेल्या होळीच्या साजाने तसेच आकर्षक पिचकारी सजावटीने अलंकृत करण्यात आले होते. ही अनोखी आणि देखणी सजावट मंदिराचे पुजारी सत्यप्रकाश दासजी यांनी भावपूर्ण सेवाभावाने साकारली. सजावटीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

तसेच ४ मार्च २०२६ रोजी नरनारायण देव जयंतीनिमित्त मंदिरात पारंपरिक पद्धतीने “फुल दोलोत्सव” साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने मंदिरात सुगंधी फुलांची आरास, विशेष सजावट, भजन-कीर्तन व महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तिमय वातावरणात भगवान नरनारायण देवांना विविधरंगी फुलांनी सजवून दोलोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिराचे कोठारी स्वयंप्रकाश दासजी, धर्म किशोर दासजी, पुजारी सत्यप्रकाश दासजी तसेच व्यवस्थापन समितीच्या वतीने सर्व पुरुष व महिला हरिभक्तांना करण्यात आले आहे. 🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.