Contact Banner

खरे अन् खोट्यातील फरक ओळखण्यासाठी विवेक आवश्यक – चैतन्य महाराज देगलूरकर; सध्या सत्य ओळखणे हेच कठीण


khare-ani-khotyatila-farak-olakhnyasathi-vivek-avashyak-chaitanya-maharaj-degalurkar-satya-olakhne-kathin


खरे अन् खोट्यातील फरक ओळखण्यासाठी विवेक आवश्यक – चैतन्य महाराज देगलूरकर; सध्या सत्य ओळखणे हेच कठीण

लेवाजगत न्यूज सावदा-कुंभारखेडा तालुका यावल येथे सुरू असलेल्या ‘आदिशक्ती फिरता नारळी सप्ताहा’त भाविकांची मोठ्या प्रमाणावर मांदियाळी होत असून, या सप्ताहातून भक्ति, अध्यात्म आणि समाजप्रबोधनाचा संगम अनुभवायला मिळत आहे. महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सप्ताहात विविध धार्मिक व प्रबोधनपर कार्यक्रम पार पडत आहेत.

सप्ताहादरम्यान आयोजित ज्ञानेश्वरी चिंतन कार्यक्रमात चैतन्य महाराज देगलूरकर यांनी खरे आणि खोटे यातील फरक ओळखण्यासाठी विवेकबुद्धी अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केले. आजच्या काळात सत्य आणि असत्य यामध्ये बेमालूम मिश्रण झाल्याने सत्य ओळखणे अधिक कठीण झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी ते म्हणाले की, देवाने माणसाला विचार करण्याची बुद्धी, परमार्थ करण्याचा अधिकार आणि संत वाङ्मय वाचण्याची संधी दिली आहे. मात्र, माणूस या गोष्टींचा योग्य वापर करत नाही, हीच त्याच्या अडचणी व समस्यांची कारणे आहेत. त्यामुळे जो विचार करतो, विवेक वापरतो तोच खऱ्या अर्थाने सुखी होतो.

भागवत गीतेतील संदेशाचा संदर्भ देत त्यांनी प्रत्येकाने योग्य-अयोग्य यातील फरक ओळखावा आणि अंधानुकरण टाळावे, असे सांगितले. गृहिणी जशी दह्यातून लोणी वेगळे करते, शेतकरी पिकातून उपयुक्त धान्य निवडतो, त्याप्रमाणे माणसानेही जीवनातील असत्य बाजूला ठेवून सत्याचा स्वीकार करावा, असे त्यांनी स्पष्ट केले. खोट्याला टिकण्यासाठी खऱ्याचा आधार घ्यावा लागतो; परंतु खऱ्याला खोट्याचा आधार लागत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दृष्टांतांचा उल्लेख करत त्यांनी राजहंस, सोनार, गृहिणी आणि शेतकरी यांच्या उदाहरणातून विवेकाचे महत्त्व पटवून दिले. सोनार जसा अग्नीच्या साहाय्याने शुद्ध सोने वेगळे करतो, त्याप्रमाणे माणसाने बुद्धीचा योग्य वापर करून सत्य-असत्य यातील भेद ओळखावा. ‘अग्निमुखी किळाळ तोडोनिया चोखा निवडती केवळ बुद्धिमंत’ या ओवीद्वारे त्यांनी विवेकाचे महत्त्व अधोरेखित केले.

ते पुढे म्हणाले की, राजहंस जसा दूध-पाणी वेगळे करतो, तसेच माणसाने संसारातील नश्वर गोष्टी बाजूला ठेवून परमात्म्याचे सार ओळखावे. जीवनात योग्य निर्णय घेण्यासाठी विचार आणि विवेक यांचा आधार घेणे अत्यंत आवश्यक आहे.

दरम्यान, रविवारी झालेल्या कीर्तनात ह.भ.प. कदम महाराज यांनीही समाजप्रबोधन करताना आत्मपरीक्षणाचे महत्त्व सांगितले. “आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस स्वतःकडे पाहणे विसरला आहे. संतविचारांचा स्वीकार करूनच खरे आत्मज्ञान मिळू शकते,” असे त्यांनी नमूद केले.

सप्ताहस्थळी नवदुर्गांचा सत्कार

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सप्ताहस्थळी लहान मुलींना ‘नवदुर्गा’ स्वरूप मानून त्यांचा सन्मान करण्यात आला. काठेवाडी कुटुंबातील नऊ मुलींचा विशेष गौरव करून त्यांना कपडे, भोजन व भेटवस्तू देण्यात आल्या.

या प्रसंगी महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील तसेच वै. डिगंबर महाराज संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांच्या हस्ते मुलींचा पूजन व सत्कार करण्यात आला. या कुटुंबात नऊ सख्ख्या बहिणी व एक भाऊ असून ते गोसेवा करीत असल्याची माहिती यावेळी समोर आली. कार्यक्रमाला ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवकांसाठी ज्ञानेश्वरी चिंतन शिबिर

महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज व मुक्ताई मंदिराचे रविंद्र महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांसाठी ज्ञानेश्वरी चिंतन व मनन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात युवकांना जीवनमूल्ये, आत्मज्ञान व अध्यात्मिक दृष्टिकोन यांचे मार्गदर्शन केले जात आहे. सप्ताहाचा समारोप २४ मार्च रोजी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.