ममता पाटील यांना “दामिनी राष्ट्रीय पुरस्कार–२०२६” प्रदान उद्योग व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; नाशिक येथे जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान
ममता पाटील यांना “दामिनी राष्ट्रीय पुरस्कार–२०२६” प्रदान
उद्योग व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; नाशिक येथे जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान
लेवाजगत न्यूज खेमचंद पाटील बदलापूर : यावल तालुक्यातील न्हावी येथील मूळ रहिवासी तसेच सध्या पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे वास्तव्यास असलेल्या सौ. ममता यशवंत पाटील यांना उद्योग व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रतिष्ठेचा “दामिनी राष्ट्रीय पुरस्कार–२०२६” प्रदान करून गौरविण्यात आले. जागतिक महिला दिनानिमित्त नाशिक येथील शालिमार परिसरातील रोटरी क्लब सभागृहात आयोजित भव्य समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सौ. ममता पाटील या महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग विभाग, मुंबईचे राज्यमंत्री रवींद्र साठे यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत असून, प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे. महिला सक्षमीकरण, ग्रामीण भागातील महिलांना उद्योग व स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन, तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार मिसेस इंडिया तसेच मिसेस इंटरनॅशनल दुबई अश्विनी अत्रे-दीक्षित यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे उपस्थित होते.
या समारंभाला नाशिकचे उपमहापौर विलासजी शिंदे, किम्स मानवता हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध सर्जन डॉ. अमित केले, शिर्डी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. जयश्रीताई थोरात, ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. आशाताई पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सौ. ममता पाटील यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सौ. ममता पाटील यांना मिळालेल्या या राष्ट्रीय सन्मानामुळे यावल तालुका, न्हावी गाव तसेच पालघर जिल्ह्यात आनंद व अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यातही त्या सामाजिक व उद्योग क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत