Contact Banner

सोयगाव तालुक्यात पाच गावांना एक तास गारपिटीचा तडाखा;-विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस;-चार गावात रब्बीचे पिके आडवे

soygaon-talukyat-pach-gavan-na-ek-tas-garapiticha-tadakha-avkali-paus-rabbi-pike-nuksan


सोयगाव तालुक्यात पाच गावांना गारपिटीचा तडाखा; रब्बी पिकांचे मोठे नुकसान

सोयगाव, ता. १८ (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) – सोयगाव तालुक्यात बुधवारी (ता. १८) सायंकाळी अवकाळी पावसासह झालेल्या जोरदार गारपिटीने पाच गावांना अक्षरशः झोडपून काढले. सायंकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत सुमारे एक तास वादळी वाऱ्यासह गारांचा मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सोयगाव शहरासह जरंडी, निंबायती, बहुलखेडा आणि धिंगापूर या गावांना या गारपिटीचा फटका बसला. सोयगाव परिसरात सुमारे १५ ते २० मिनिटे गारपीट झाली, तर इतर चार गावांमध्ये तब्बल एक तास गारांचा पाऊस कोसळला.

दरम्यान, जरंडी परिसरात दुपारी चार वाजता विजांच्या कडकडाटासह पहिली गारपीट झाली आणि सायंकाळी साडेसहा वाजता पुन्हा गारांचा तडाखा बसल्याने दुहेरी फटका बसला. निंबायती आणि धिंगापूर येथेही दुपारपासूनच गारपिटीची सुरुवात झाली होती.

गारांच्या पावसामुळे गावोगावी गारांचा खच साचला होता. वादळी वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, बाजरी, मका आणि कांदा ही कापणीस आलेली पिके मोठ्या प्रमाणात आडवी झाली. विशेषतः निंबायती आणि धिंगापूर शिवारात जवळपास शंभर टक्के पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

निंबायती गावात वादळी वाऱ्यामुळे काही घरांच्या छपरावरील पत्रे उडाल्याचीही घटना घडली. ऐन कापणीच्या तोंडावर आलेली पिके नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, “होत्याचे नव्हते झाले” अशी भावना व्यक्त होत आहे.


चार गावांमध्ये मोठे नुकसान

जरंडी, निंबायती, धिंगापूर आणि बहुलखेडा या चार गावांमध्ये तासभर चाललेल्या गारपिटीमुळे कापणीस आलेली गहू, ज्वारी, बाजरी व मका ही पिके पूर्णपणे आडवी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेले उत्पन्न अक्षरशः निसटले आहे.

दरम्यान, रात्री उशिरापर्यंत अवकाळी पावसाची रिपरिप सुरूच होती, त्यामुळे नुकसानीत आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.