मोबाईलमध्ये पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या संशयावरून तरुणाचा खून पती-पत्नी अटकेत; पिंपळगाव हरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मोबाईलमध्ये पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या संशयावरून तरुणाचा खून
पती-पत्नी अटकेत; पिंपळगाव हरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव, दि. १५ (प्रतिनिधी) – पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा क्रमांक ३ येथे एका तरुणाच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मोबाईलमध्ये पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या संशयावरून पती-पत्नीने संगनमताने तरुणाचा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मयत तरुणाचे नाव विजय भीमा राठोड असे असून, आरोपी म्हणून संजय परशुराम जाधव व त्याची पत्नी सोनाली संजय जाधव यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी मयत विजयचा भाऊ संजय भीमा राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विजय राठोड याने आरोपी सोनाली जाधव हिचे काही अश्लील व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केल्याची माहिती तिचा पती संजय जाधव याला मिळाली होती. यावरून दोघांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला. त्यानंतर विजय राठोडचा कायमचा बंदोबस्त करण्याचा कट पती-पत्नीने रचल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
या कटानुसार चोवीस फेब्रुवारी रोजी रात्री आरोपींनी विजय राठोड याला बोलावून त्याच्यावर हल्ला केला व त्याची हत्या केली. गुन्ह्याचा कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून आरोपींनी मृतदेह अज्ञात ठिकाणी नेऊन त्याची विल्हेवाट लावल्याचेही तपासात समोर आले आहे.
दरम्यान, विजय राठोड काही दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला होता. पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान संशयाची सुई संजय जाधव व त्याची पत्नी सोनाली जाधव यांच्याकडे वळल्याने पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. चौकशीतून या खुनाचा उलगडा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तेरा मार्च रोजी संजय जाधव व सोनाली जाधव या दोघांना अटक केली.
दरम्यान, विजय राठोड याची हत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट नेमकी कुठे लावण्यात आली, याबाबतचा तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली असून मोबाईलमधील अश्लील व्हिडिओच्या कारणावरून घडलेल्या या हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत