मुंब्र्यात धक्कादायक प्रकार; मालमत्तेच्या वादातून तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
मुंब्र्यात धक्कादायक प्रकार; मालमत्तेच्या वादातून तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
लेवाजगत न्युज ठाणे : मुंब्रा पोलीस ठाण्याच्या समोर शनिवारी संध्याकाळी मालमत्तेच्या वादातून एका तरुणाने स्वतःवर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथील दुकानाच्या मालमत्तेवरून बाप अर्जुन चौरसिया आणि त्यांची दोन मुले मनोज चौरसिया व अशोक चौरसिया यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. या प्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकटेश आंधळे यांनी कायदेशीर प्रक्रिया करून प्रकरण दिवाणी न्यायालयात पाठविले होते आणि सध्या ते न्यायालयात सुरू आहे.
दरम्यान, प्रकरण न्यायालयात सुरू असतानाच अर्जुन चौरसिया यांनी संबंधित मालमत्तेचा व्यवहार करून दुकानाच्या कामाला सुरुवात केली. मात्र हा निर्णय मुलांना मान्य नसल्याने वाद अधिकच वाढला. याच वादातून संतापलेल्या मनोज चौरसिया यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला आग लावून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
घटना घडली तेव्हा दुकानात काही पोलीस कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी तात्काळ मदत करत गंभीर जखमी झालेल्या मनोज चौरसिया यांना रुग्णवाहिकेतून मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. सुरुवातीला मनोज यांनी रुग्णवाहिकेत बसण्यास नकार दिला होता, मात्र पोलिसांनी समजावून त्यांना उपचारासाठी रवाना केले.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने पोलिसांकडून पुढील काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत