Contact Banner

एनमुक्टोच्या पाठपुराव्याला यश : परीक्षा कालावधीत ८-९ दिवसांची कपात

 

nmuktocha-pathpuravyala-yash-pariksha-kalavadhit-8-9-divsanchi-kapat

एनमुक्टोच्या पाठपुराव्याला यश : परीक्षा कालावधीत ८-९ दिवसांची कपात

लेवाजगत न्यूज जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या परीक्षा वेळापत्रकावरून निर्माण झालेल्या वादावर अखेर तोडगा निघाला आहे. एनमुक्टो (NMUCTO) प्राध्यापक संघटनेच्या पाठपुराव्याला यश मिळत परीक्षा कालावधीत ८ ते ९ दिवसांची कपात करण्यात आली असून संघटनेने प्रस्तावित आंदोलन मागे घेतले आहे.

दि. २९ मार्च २०२६ रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरूंशी सुमारे दोन तास चर्चा केली. यावेळी परीक्षा ३० मेपर्यंत लांबण्यामागे परीक्षा विभागाची चूक असल्याचे कुलगुरूंनी मान्य केले. मात्र तांत्रिक अडचणींमुळे तातडीने मोठे बदल शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्राध्यापकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने आणि कुलगुरूंच्या आवाहनाचा आदर राखत एनमुक्टोने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर परीक्षा कालावधी ३० मे ऐवजी २२ मे २०२६ पर्यंत आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे एकूण ८ ते ९ दिवसांची कपात झाली आहे. नवीन वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे.

दरम्यान, उन्हाळी सुट्ट्यांमध्येही बदल करण्यात आला असून पूर्वीचा ६ मे ते १५ जून हा कालावधी बदलून १५ मे ते २३ जून असा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या बैठकीला कुलगुरू प्रा. डॉ. विजय महेश्वरी, प्र-कुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्यासह एनमुक्टोचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. नितीन बाविस्कर, सहसचिव डॉ. विजय सोनजे तसेच जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील पदाधिकारी आणि इतर प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थी हित लक्षात घेऊन परीक्षा कालावधी कमी करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया विविध शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.