सावदा नगरपरिषदेला ८० फूट रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत निवेदन-उपनगराध्यक्ष फिरोजखान पठाण, नगरसेवकांसह १३ नागरिकांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी
सावदा नगरपरिषदेला ८० फूट रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत निवेदन -उपनगराध्यक्ष फिरोजखान पठाण, नगरसेवकांसह १३ नागरिकांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी
लेवाजगत न्यूज सावदा (ता. रावेर) : शहरातील ८० फूट मुख्य रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सावदा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष फिरोजखान पठाण, नगरसेवक पंकज येवले, सचिन बऱ्हाटे यांच्यासह १३ नागरिकांनी मुख्याधिकारी भूषण वर्मा यांना लेखी निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली.
दि. ३ मार्च २०२६ रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित ८० फूट रस्त्यालगत काही ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले असून त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. परिणामी वाहतुकीची कोंडी, नागरिकांमध्ये वादाचे प्रसंग तसेच आपत्कालीन सेवांना अडथळा निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.
याबाबत यापूर्वीही प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्याचा उल्लेख निवेदनात असून, अद्याप ठोस कारवाई न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. संबंधित अतिक्रमण तात्काळ हटवून रस्ता मोकळा करावा तसेच गरज असल्यास संबंधितांना पर्यायी जागेची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी निवेदनाची दखल घेत लवकरच प्रत्यक्ष पाहणी करून नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती प्रतिनिधींनी दिली.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत