Contact Banner

सावद्यात पत्नीला मारहाण करून ‘ट्रिपल तलाक’; पतीसह सासरच्यांविरोधात तक्रार

 

savdyat-patnila-marhan-karun-triple-talaq-patisah-sasarchyanvirodhat-takrar


सावद्यात पत्नीला मारहाण करून ‘ट्रिपल तलाक’; पतीसह सासरच्यांविरोधात तक्रार

लेवाजगत न्यूज सावदा  प्रतिनिधी-

सावदा शहरातील गौसिया नगर परिसरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेला पतीकडून मारहाण करून तिच्यासमोरच “तलाक, तलाक, तलाक” असे तीन वेळा उच्चारून कथितपणे ट्रिपल तलाक दिल्याची घटना घडली असून याप्रकरणी संबंधित महिलेने पतीसह सासरच्या मंडळींविरोधात सावदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला व तिचे पती नदीम नजीर खान हे दिनांक २२ जानेवारी २०२६ पासून घरगुती वादामुळे सावदा येथील गौसिया नगर भागात भाड्याच्या घरात राहत होते. दरम्यान पतीचे वारंवार फोनवर कोणाशी तरी बोलणे यावरून दोघांमध्ये वाद होत असल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.

या बाबत तिने सासरे नजीर खान तसेच नणंद साजिदाबी शेख फारूक (रा. यावल), गुलनाज बी. रईस (रा. सावदा), मिनाज बी. शाहरुख (रा. पुणे), रुक्सार बी. शेख साजिद (रा. भुसावळ) व हिना शेख आबित (रा. सावदा) यांना वारंवार सांगितले. मात्र त्यांनी पतीला समजावण्याऐवजी उलट महिलेचाच दोष काढून तिच्या माहेरच्या लोकांकडून संसारासाठी मदत होत नसल्याचे सांगत पतीच्या मनात तिच्याविरोधात भडकावण्याचे काम केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तसेच पतीला माहेरहून कामधंद्यासाठी तीन लाख रुपये आणण्यास सांगितले जात असल्याचेही महिलेने म्हटले आहे. पैसे आणण्यास नकार दिल्यावर पतीकडून वारंवार मारहाण, शिवीगाळ व मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

दरम्यान रमजान महिन्यात पतीने गोड बोलून तिला काही दिवस माहेरी जाण्यास सांगितले. त्यानुसार रमजानच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रोजी तिला तिच्या आईसोबत माहेरी पाठवण्यात आले. माहेरी चार-पाच दिवस राहिल्यानंतर पतीला परत नेण्याबाबत विचारले असता “तू तुझ्या बापाच्या घरीच रहा, मी तुला तलाक देणार आहे,” असे सांगून तो तिला घ्यायला आला नाही, असे तक्रारीत म्हटले आहे.

त्यानंतर दिनांक ९ मार्च २०२६ रोजी सकाळी पती नदीम खान यांनी महिलेच्या भावाला फोन करून “माझे आधार कार्ड सापडत नाही, तुझ्या बहिणीला माझ्या घरी घेऊन ये,” असे सांगितले. त्यानंतर ते स्वतः महिलेच्या वडिलांच्या घरी मोटारसायकलने आले व आधार कार्ड शोधण्याचे कारण सांगून तिला सावदा येथील भाड्याच्या घरी घेऊन गेले.

दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घरात पोहोचल्यानंतर महिलेने कपाटातून पतीचे आधार कार्ड काढून दिले. त्यानंतर पतीने अचानक शिवीगाळ सुरू करून तिच्यावर अत्यंत आक्षेपार्ह आरोप करत चापटांनी मारहाण केली, असे तक्रारीत नमूद आहे.

घरातील भांडणाचा आवाज ऐकून समोर राहणारे शेख वाजिद शेख हमीद हे घरात आले व त्यांनी दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या समक्षच पती नदीम नजीर खान यांनी “तलाक, तलाक, तलाक” असे तीन वेळा उच्चारून तिला कथितपणे ट्रिपल तलाक दिला असल्याचे सांगितले व घराबाहेर काढून घराला कुलूप लावून तेथून निघून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेनंतर महिलेने शेजाऱ्याच्या फोनवरून वडिलांना घटनेची माहिती दिली. काही वेळात तिचे वडील तेथे येऊन तिला घरी घेऊन गेले. त्यानंतर कुटुंबीयांनी विचारविनिमय करून या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दरम्यान या प्रकरणात पतीसह सासरच्या काही सदस्यांवरही आरोप करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.