सावद्यात श्रीरामचंद्र व श्री स्वामिनारायण भगवान प्रागट्य उत्सव सोहळा भक्तिभावात संपन्न
सावद्यात श्रीरामचंद्र व श्री स्वामिनारायण भगवान प्रागट्य उत्सव सोहळा भक्तिभावात संपन्न
सावदा (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) – पुरातन असलेल्या श्री स्वामिनारायण मंदिर सावदा येथे चैत्र शुद्ध नवमी निमित्त श्री रामचंद्र भगवान प्रागट्य व श्री स्वामिनारायण भगवान प्रागट्य उत्सव सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. शहरातील तसेच परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक सोहळ्याचा लाभ घेतला.
दि. १९ रोजी गुरुवारी सकाळी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कोठारी शास्त्री स्वयंप्रकाश दासजी यांनी भजन सादर करत श्रीरामाच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय केले. त्यानंतर शास्त्री स्वामी विश्वप्रकाश दासजी यांच्या हस्ते भगवान श्रीरामांची आरती संपन्न झाली. या प्रसंगी मोठ्या संख्येने हरिभक्त उपस्थित होते.
त्यानंतर रात्री १० वाजून १० मिनिटांनी श्री स्वामिनारायण भगवान यांचा जयंती प्रागट्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी मंदिराचे पुजारी सत्यप्रकाश दासजी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. विशेष म्हणजे, सजवलेल्या पाळण्यामध्ये भगवानांची मूर्ती ठेवून आकर्षक धार्मिक वातावरण निर्माण करण्यात आले होते. प्रागट्य वेळेपूर्वी भजन-कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यात भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या संपूर्ण कार्यक्रमात कोठारी शास्त्री स्वयंप्रकाश दासजी ,भक्ती प्रिय शास्त्री,विश्वाप्रकाश शास्त्री,दीपक भगत यांची उपस्थिती लाभली. तसेच गुरुवर्य शास्त्री स्वामी भक्ती प्रकाश दाजी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व धार्मिक विधी शास्त्रोक्त पद्धतीने पार पडले.
या सोहळ्याचे आयोजन स्वामिनारायण सत्संग समाज, सावदा यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिराचे कोठारी स्वयंप्रकाश दासजी, विश्व प्रकाश दाजी तसेच पुजारी सत्यप्रकाश दासजी, माधव स्वामी व भक्तीप्रिय दासजी यांनी विशेष परिश्रम घेतले.
या भव्य धार्मिक सोहळ्यामुळे सावदा शहरात भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिकतेचे वातावरण अनुभवायला मिळाले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत