शेतकरी, उद्योग, पायाभूत सुविधा व संस्कृतीच्या संवर्धनाला बळ देणारा अर्थसंकल्प : आमदार अमोल जावळे ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ धोरणाचे अर्थसंकल्पात प्रतिबिंब
शेतकरी, उद्योग, पायाभूत सुविधा व संस्कृतीच्या संवर्धनाला बळ देणारा अर्थसंकल्प : आमदार अमोल जावळे
‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ धोरणाचे अर्थसंकल्पात प्रतिबिंब
लेवाजगत न्यूज प्रतिनिधी सावदा -
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी विधानसभेत सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक, विकासाभिमुख आणि राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग प्रशस्त करणारा असल्याची प्रतिक्रिया Amol Jawale यांनी व्यक्त केली आहे. शेतकरी, युवाशक्ती आणि महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या आमदार अमोल जावळे यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत करत राज्याच्या विकासासाठी तो महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
शेतकरी, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार, पर्यावरण आणि सांस्कृतिक वारसा या सर्व क्षेत्रांचा समतोल विचार करून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याची क्षमता या अर्थसंकल्पात असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान Narendra Modi यांनी मांडलेल्या “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या विकासदृष्टीचे प्रतिबिंब राज्याच्या अर्थसंकल्पात स्पष्टपणे दिसून येत असल्याचेही आ. जावळे यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करताना आ. जावळे म्हणाले की, राज्यातील शेतकरी वर्गाला दिलासा देणाऱ्या कर्जमाफीसारख्या निर्णयांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. शेती हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारा हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या लाखो शेतकऱ्यांना नव्या उमेदीने उभे राहण्याची संधी मिळेल आणि शेती क्षेत्राला बळ मिळेल.
तसेच उद्योग क्षेत्राला चालना देणाऱ्या विविध तरतुदी, रोजगारनिर्मितीला गती देणारे उपक्रम, पायाभूत सुविधा मजबूत करणारे प्रकल्प, शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील गुंतवणूक तसेच पर्यावरण संवर्धनासंबंधीचे निर्णय यामुळे महाराष्ट्राचा विकास अधिक व्यापक आणि शाश्वत होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
याशिवाय वनहक्क कायद्यांतर्गत आदिवासी बांधवांना मिळालेल्या जमिनींना शेतकरी ओळख क्रमांक देण्याचा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या निर्णयामुळे आदिवासी शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांचा थेट लाभ मिळण्यास मदत होणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील संतुलित विकासाचा विचार या अर्थसंकल्पातून स्पष्टपणे दिसून येत असल्याचेही आ. जावळे यांनी नमूद केले.
आमदार अमोल जावळे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने सादर केलेला हा अर्थसंकल्प म्हणजे विकास, संवेदनशीलता आणि दूरदृष्टी यांचा सुंदर संगम आहे. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला, उद्योगपती आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या प्रगतीला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत