Contact Banner

विश्रामगृह ते पिंपरुड रोडवर पथदिवे व गतिरोधकांची मागणी नगरसेविका सिमरन वानखेडे यांचे नगरपरिषदेला निवेदन

 

vishramgruha-te-pimparud-road-pathdive-va-gatirodhakanchi-magni-nagarsevika-simran-wankhede-nivedan


विश्रामगृह ते पिंपरुड रोडवर पथदिवे व गतिरोधकांची मागणी

नगरसेविका सिमरन वानखेडे यांचे नगरपरिषदेला निवेदन

सावदा लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-

सावदा शहरातील विश्रामगृह ते रिंगरोड (पिंपरुड रोड) या मार्गावर पथदिवे व गतिरोधकांची उभारणी करावी, अशी मागणी नगरसेविका कु. सिमरन राजेश वानखेडे तसेच इतर महिला नगरसेविकांनी नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सावदा शहरातील विश्रामगृह ते रिंगरोड या मार्गावर दररोज सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात नागरिक पायी फिरण्यासाठी येत असतात. विशेषतः महिला व तरुणींची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हा रस्ता नुकताच रुंद व नव्याने तयार करण्यात आला असून परिसरातील रहिवासी भागालगत असल्याने नागरिकांसाठी वॉकिंगसाठी हा मार्ग उपयुक्त ठरत आहे.

मात्र या मार्गावर पथदिव्यांची सुविधा अपुरी असल्याने रात्रीच्या वेळी काही ठिकाणी अंधार पसरलेला असतो. त्यामुळे नागरिकांना, विशेषतः महिलांना व तरुणींना सुरक्षिततेच्या दृष्टीने धोका निर्माण होत असल्याचे नगरसेविकांनी नमूद केले आहे.

तसेच स्वर्गीय खासदार हरिभाऊ जावळे यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आमोदा-पाल राज्यमार्गावर लहान-मोठ्या तसेच अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. काही वाहनचालक मोटारसायकली अतिवेगाने चालवत असल्याने या भागात लहान-मोठे अपघात वारंवार होत असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे.

विश्रामगृह चौकात एकाच ठिकाणी तीन रस्ते एकत्र येत असल्याने येथे वाहतुकीची कोंडी निर्माण होते. मात्र या ठिकाणी गतिरोधक नसल्यामुळे वाहने समोरासमोर येऊन अपघात होण्याचा धोका कायम असल्याचे निवेदनात नमूद आहे. त्यामुळे वाहनचालकांना वेगमर्यादेचे भान राहावे यासाठी या चौकात गतिरोधक बसविणे अत्यावश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान या दोन्ही बाबी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असून यापूर्वी नागरिकांनी अनेकदा या संदर्भात मागणी करूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे.

त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने पुढाकार घेत या मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी पथदिवे बसवावेत तसेच विश्रामगृह चौकात गतिरोधक उभारून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नगरसेविका कु. सिमरन वानखेडे व इतर महिला सदस्यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.