Contact Banner

अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! ‘परीक्षा आणि सत्यपरीक्षा’ विषयावर यजुर्वेद महाजन यांचे प्रेरणादायी व्याख्यान

 

ambarnath-students-golden-opportunity-yajurved-mahajan-lecture-exam-and-truth-test


अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!

 ‘परीक्षा आणि सत्यपरीक्षा’ विषयावर यजुर्वेद महाजन यांचे प्रेरणादायी व्याख्यान


लेवा जगत प्रतिनिधी, खेमचंद पाटील, मुंबई.-   विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर योग्य दिशा, आत्मविश्वास आणि यशाचा मंत्र देणारे प्रेरणादायी व्याख्यान अंबरनाथमध्ये आयोजित करण्यात आले आहे. रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ आणि लेवा पाटील समाज मंडळ, अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता रोटरी सभागृह, वडवली, अंबरनाथ (पूर्व) येथे प्रसिद्ध वक्ते यजुर्वेद महाजन यांचे ‘परीक्षा आणि सत्यपरीक्षा’ या विषयावर विशेष मार्गदर्शन होणार आहे.


दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी हे व्याख्यान अत्यंत उपयुक्त ठरणार असून, परीक्षेचा ताण कसा हाताळावा, यशस्वी करिअरसाठी कोणती दिशा निवडावी आणि आत्मविश्वासाने पुढे कसे वाटचाल करावी याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार आहे.


यजुर्वेद महाजन हे ‘दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल’चे संस्थापक असून, वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. देशभरात अडीच हजारांहून अधिक व्याख्याने देत त्यांनी लाखो विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली आहे. अमेरिका, जपान, मॉरिशससह विविध देशांमध्येही त्यांच्या विचारांचा प्रभाव पोहोचला आहे.


विद्यार्थ्यांच्या मनात सकारात्मक ऊर्जा, मोठी स्वप्ने आणि यशाची उमेद निर्माण करणारी त्यांची खास शैली सर्वत्र लोकप्रिय आहे. उच्च शिक्षणाची स्वप्ने पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे व्याख्यान नक्कीच दिशादर्शक ठरणार आहे.


कार्यक्रम विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.