Contact Banner

भडगाव शेतकी संघाचा ‘भोंगळ’ कारभार; टोकनसाठी २४ तास रांग, पोलिसांचा लाठीचार्ज, शेतकऱ्यांत संताप

 

bhadgaon-shetki-sangh-bhongal-karbhar-token-sathi-24-tas-rang-polisancha-lathicharge-shetkaryant-santap


भडगाव शेतकी संघाचा ‘भोंगळ’ कारभार; टोकनसाठी २४ तास रांग, पोलिसांचा लाठीचार्ज, शेतकऱ्यांत संताप

भडगाव (लेवाजगत न्यूज वार्ताहर):
डिजिटल युगात देश झपाट्याने पुढे जात असताना भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मात्र आपले धान्य विकण्यासाठी अक्षरशः संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. भडगाव शेतकी संघाच्या भोंगळ नियोजनामुळे ज्वारी खरेदीसाठी टोकन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना तब्बल २४ तास रांगेत थांबावे लागले. याच दरम्यान गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे शेतकरी वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार (दि. ६ एप्रिल) रात्रीपासूनच भडगाव तालुक्यातील विविध गावांमधील शेतकरी टोकन मिळवण्यासाठी शेतकी संघ कार्यालयासमोर जमा होऊ लागले होते. मंगळवार दुपारपर्यंतही शेकडो शेतकरी भर उन्हात रांगेत उभे होते. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस व्यवस्था करण्यात आली नव्हती. पिण्याचे पाणी, सावली किंवा बसण्याची सोय नसल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटला आणि परिसरात गोंधळ निर्माण झाला.

गर्दी वाढत चालल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र गोंधळ अधिकच वाढल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे सांगण्यात येते. या घटनेमुळे उपस्थित शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.

“वर्षभर शेतात कष्ट करून पीक पिकवायचं आणि ते विकण्यासाठी अशा प्रकारे त्रास सहन करावा लागतो, ही दुर्दैवी बाब आहे. आता तर धान्य विकण्यासाठी पोलिसांचा मारही सहन करावा लागत आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, या प्रकारामुळे शेतकी संघाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नियोजनाच्या अभावामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची टीका होत आहे. लाठीचार्जदरम्यान कारवाई करणारे पीएसआय सोनवणे यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून योग्य नियोजन व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.