भुसावळात धडाकेबाज कारवाई : ३ चोरीच्या दुचाकी जप्त, २ आरोपी निष्पन्न
भुसावळात धडाकेबाज कारवाई : ३ चोरीच्या दुचाकी जप्त, २ आरोपी निष्पन्न
लेवाजगत न्यूज भुसावळ : जळगाव जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे शाखा (LCB), जळगाव आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत तीन चोरीच्या महागड्या दुचाकी जप्त केल्या असून, या प्रकरणात दोन आरोपी निष्पन्न झाले आहेत.
दिनांक ०६ एप्रिल २०२६ रोजी शहरात पेट्रोलिंगदरम्यान पथकाला गुप्त माहिती मिळाली की, इराणी मोहल्ला परिसरातील रजा टॉवरजवळ काही संशयास्पद दुचाकी उभ्या आहेत. पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासणी केली असता तेथे तीन दुचाकी आढळून आल्या; मात्र त्या वाहनांचे मालक तेथे उपस्थित नव्हते. त्यानंतर सदर दुचाकी पोलीस स्टेशनला आणून त्यांच्या इंजिन व चेसिस नंबरची पडताळणी करण्यात आली.
या तपासात संबंधित दुचाकी मुक्ताईनगर, चोपडा आणि अहिल्यानगर (तोफखाना) पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक चौकशीत हसन अली उर्फ आशू नियाज अली इराणी आणि सलमान अली हुजूर अली इराणी (दोघे रा. इराणी मोहल्ला, भुसावळ) यांनी या दुचाकी चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. जप्त करण्यात आलेल्या दुचाकींमध्ये पल्सर १२५, बजाज पल्सर N-160 आणि KTM Duke 250 या गाड्यांचा समावेश असून, त्यांची एकूण अंदाजे किंमत २ लाख १० हजार रुपये आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व त्यांच्या पथकासह भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे केली.
सदर प्रकरणी पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत