Contact Banner

घारापुरी (एलिफंटा) बेटावर उत्खननात महाकाय साठवणूक जार सापडले; मोराबंदर येथील प्राचीन व्यापारी वैभवावर पडला प्रकाश

 

gharapuri-elephanta-bet-utkhananat-mahakay-sathavanuk-jar-sapadle-morabandar-prachin-vyapari-vaibhav-prakash


घारापुरी (एलिफंटा) बेटावर उत्खननात महाकाय साठवणूक जार सापडले; मोराबंदर येथील प्राचीन व्यापारी वैभवावर पडला प्रकाश

 

उरण :सुनिल ठाकूर-मुंबई जवळील जागतिक वारसा स्थळ असलेल्या घारापुरी (एलिफंटा) बेटावरील मोराबंदर येथे सुरू असलेल्या उत्खननात पुरातत्व विभागाला मोठे यश मिळाले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण , मुंबई मंडल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या उत्खननात दोन प्रचंड आकाराचे साठवणूक जार (Storage Jars) सापडले असून, यामुळे या बेटाच्या प्राचीन व्यापारी इतिहासातील एका नव्या अध्यायाचा उलगडा झाला आहे.


मोराबंदर येथील उत्खनन सध्या सहा वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये सुरू आहे. ताज्या माहितीनुसार, एका विशिष्ट पॉकेटमध्ये मिळालेले अवशेष थक्क करणारे आहेत. उत्खननात दोन मोठे जार सापडले आहेत. त्यातील एकाची उंची १.२५ मीटर आहे, तर दुसऱ्या तुटलेल्या जारचा व्यास १.२२ मीटर इतका आहे. हे जार पाणी साठवण्यासाठी वापरले जात असावेत असा अंदाज आहे. येथे रोमन ॲम्फोरा (Amphorae), पश्चिम आशियातील टॉर्पेडो जार, चायनीज पोर्सिलेन आणि 'टर्क्वाइझ ग्लेझ वेअर'चे अवशेष सापडले आहेत. यावरून इसवी सन ४ थ्या आणि ५ व्या शतकात या बंदराचा रोम आणि पश्चिम आशियाशी थेट व्यापार असल्याचे सिद्ध होते. जार सापडलेल्या ठिकाणापासून ८० मीटर अंतरावर विटांनी बांधलेली आणि खडकात कोरलेली पाण्याची टाकी सापडली आहे. याचा वापर कापड रंगवण्याच्या प्रक्रियेसाठी केला जात असावा, असे मानले जात आहे. उत्खननात लोखंडी गोळे (Ingots), दगडी नांगर तसेच कलचुरी आणि क्षत्रप काळातील नाणी सापडली आहेत.


घारापुरीसारख्या खडकाळ बेटावर पाण्याची टंचाई असतानाही, प्राचीन रहिवाशांनी आणि व्यापाऱ्यांनी पाणी साठवण्यासाठी जलकुंभ आणि साठवणूक टाक्यांची केलेली रचना त्यांच्या प्रगत अभियांत्रिकी कौशल्याचे दर्शन घडवते. हे पाणी जहाजांवरील प्रवाशांसाठी आणि स्थानिक उद्योगांसाठी वापरले जात असे.


हे महत्त्वाचे अवशेष पावसाळ्यापूर्वी सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम ASI च्या सायन्स ब्रँचच्या सहकार्याने सुरू आहे. हे महाकाय जार पुनर्संचयित करून पर्यटकांच्या माहितीसाठी एलिफंटा लेण्यांच्या प्रवेशद्वारावर प्रदर्शनासाठी ठेवले जाणार आहेत. या उत्खननात डेक्कन कॉलेज पोस्ट-ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट, पुणे हे प्रमुख सहयोगी  म्हणून काम पाहत असून, मुंबईच्या के. जे. सोमय्या महाविद्यालयाने यात सहभागी म्हणून योगदान दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.