Contact Banner

डॉ. अनिल पाटीलांचा महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणुकीत विक्रमी विजय जिल्ह्यातून थेट निवडणुकीद्वारे निवडून जाणारे पहिले सदस्य; जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा

 

dr-anil-patil-maharashtra-medical-council-election-2026-record-victory-jalgaon

डॉ. अनिल पाटीलांचा महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणुकीत विक्रमी विजय

जिल्ह्यातून थेट निवडणुकीद्वारे निवडून जाणारे पहिले सदस्य; जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा

जळगाव लेवाजगत न्यूज प्रतिनिधी

जळगावच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी ठरलेल्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC) निवडणूक २०२६ मध्ये जळगावचे सुप्रसिद्ध युरो सर्जन व गायत्री हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनिल भास्कर पाटील यांनी ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. राज्यभरातील दीड ते पावणेदोन लाख डॉक्टरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत त्यांनी राज्यात सहावा क्रमांक पटकावत दमदार यश मिळवले आहे.

विशेष म्हणजे, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या इतिहासात जळगाव जिल्ह्यातून थेट निवडणुकीद्वारे निवडून जाणारे ते पहिलेच सदस्य ठरले आहेत. त्यामुळे संपूर्ण खान्देशासह जळगाव जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुप्रीम कोर्टाच्या महत्त्वपूर्ण आदेशानंतर या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली होती. २६ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली राज्यभर मतदान पार पडले. तब्बल ६० दिग्गज उमेदवारांच्या रिंगणात डॉ. पाटील यांनी सुरुवातीपासून आघाडी कायम ठेवली. २९ आणि ३० एप्रिल रोजी झालेल्या मतमोजणीनंतर त्यांच्या विजयावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले. निर्वाचन अधिकारी सुनीलकुमार धोंडे यांनी अधिकृत पत्राद्वारे निकाल जाहीर करताच जळगावच्या वैद्यकीय क्षेत्रात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.

या विजयामागे निवडणूक रणनीतीकार डॉ. अनिता भोळे यांचे मोठे योगदान मानले जात आहे. निवडणुकीचे वातावरण निर्माण झाल्यापासून त्यांनी प्रचाराची संपूर्ण धुरा सांभाळली. राज्यव्यापी संपर्क जाळे उभारणे, महत्त्वाचे निर्णय घेणे आणि ‘वॉर रूम’च्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी अत्यंत सूक्ष्म नियोजन केले. आधुनिक तंत्रज्ञान आणि वैयक्तिक संवादाचा प्रभावी मेळ घालत जळगावच्या टीमने हा ऐतिहासिक विजय मिळवला.

या संपूर्ण प्रवासात गोदावरी फाउंडेशनचे डॉ. उल्हास पाटील आणि डॉ. वर्षा पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच जिल्ह्यातील दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयांचे हितचिंतक आणि आयएमए जळगावच्या सदस्यांनीही प्रचार मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

प्रचार मोहिमेत डॉ. विलास भोळे, डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. जितेंद्र कोल्हे, डॉ. शशिकांत गाजरे, डॉ. अजय शास्त्री, डॉ. अतुल चौधरी, डॉ. सचिन इंगळे, डॉ. तुषार बेंडाळे, डॉ. भरत बोरोले यांच्यासह आयएमए जळगावचे अध्यक्ष डॉ. धनंजय बोरोले, सचिव डॉ. पंकज शहा, उपाध्यक्ष डॉ. विनोद बाविस्कर आणि डॉ. प्रशांत वारके यांच्या टीमने अहोरात्र मेहनत घेतली. प्रत्यक्ष मतदानासाठी उपस्थित राहिलेले तसेच विविध कारणांमुळे उपस्थित राहू न शकले तरी पाठिंबा दर्शविणाऱ्या सर्व डॉक्टरांच्या विश्वासाचा हा विजय असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

आजवर जळगाव जिल्ह्याला एमएमसीमध्ये थेट लोकशाही मार्गाने निवडून आलेले नेतृत्व लाभले नव्हते. डॉ. अनिल पाटील यांच्या निवडीमुळे आता डॉक्टरांच्या समस्या, वैद्यकीय क्षेत्रातील धोरणात्मक बदल आणि आरोग्यसेवेच्या विकासात जळगावचा आवाज अधिक प्रभावीपणे पोहोचणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.