Contact Banner

हिंदू राष्ट्र ही भारताची शाश्वत ओळख : भैय्याजी जोशी

 

hindu-rashtra-bharatachi-shashwat-olakh-bhaiyyaji-joshi-statement


हिंदू राष्ट्र ही भारताची शाश्वत ओळख : भैय्याजी जोशी



लेवा जगत : प्रतिनिधी खेमचंद पाटील, मुंबई-   “भारत हिंदू राष्ट्र केव्हा होणार? हा प्रश्नच अनाठायी आहे. भारत हे मुळात हिंदू राष्ट्र होते, आहे आणि पुढेही राहील,” असे ठाम प्रतिपादन भैय्याजी जोशी यांनी केले. इतिहासात असा एकही कालखंड नव्हता की भारत हिंदू राष्ट्र नव्हता, असे सांगत त्यांनी भारत हे मृत्युंजय राष्ट्र असल्याचेही नमूद केले.

               खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) सन्माननीय श्री.रवींद्र साठे लिखित 'राष्ट्रभाव' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. मिहाना पब्लिकेशन्सच्या वतीने 'वसंत स्मृती', दादासाहेब फाळके मार्ग, दादर (पूर्व), मुंबई येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. विविध क्षेत्रांतील मान्यवर, साहित्यप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची यावेळी मोठी उपस्थिती होती.

            विनायक दामोदर सावरकर यांच्या सहा सोनेरी पाने या ग्रंथाचा संदर्भ देत, भारताच्या वैभवशाली इतिहासाचे सातवे सोनेरी पान आज लिहिले जात असल्याचे भैय्याजी जोशी म्हणाले. भारत आज शक्तिशाली राष्ट्र म्हणून जगासमोर उभा राहत असून, संरक्षणक्षम आणि मार्गदर्शक राष्ट्र म्हणून त्याची ओळख निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

             'राष्ट्रभाव' या पुस्तकात भारतीय राष्ट्रवाद, संस्कृती, सामाजिक विचार, वैचारिक परंपरा आणि राष्ट्रीय अस्मितेवरील विविध लेखांचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय आणि पाश्चिमात्य राष्ट्रवादातील मूलभूत भेद स्पष्ट करत भारतीय राष्ट्रवाद हा सांस्कृतिक, मूल्याधिष्ठित आणि सर्वसमावेशक असल्याचे प्रभावी विवेचन या ग्रंथात करण्यात आल्याचे मत आमदार श्री.अतुल भातखळकर यांनी व्यक्त केले.

              तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ज्ञानयुक्त कर्मयोग, राष्ट्र ही केवळ भौगोलिक संकल्पना नसून ती जिवंत चेतना आहे, सामाजिक राष्ट्रवाद तसेच भीमराव रामजी आंबेडकर यांच्या विचारांचाही पुस्तकात सखोल परामर्श घेण्यात आला आहे.

           या प्रसंगी श्री.अमित साटम, अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी मुंबई, तसेच मा.आ.राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, पदमश्री दादा इदाते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.