Contact Banner

पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; तिघे आरोपी अटकेत

chopda-young-man-murder-stone-attack-old-dispute-jalgaon-news


पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; तिघे आरोपी अटकेत

लेवाजगत न्यूज प्रतिनिधी – चोपडा:
शहरातील तिरंगा चौकाजवळील हातूर पाटाची परिसरात प्रदीप राजेंद्र माळी (वय ३२) या तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात चोपडा शहर पोलिस ठाण्यात तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे तर दोघे फरार आहेत.

मृत प्रदीप माळी हा हमालीचे काम करत होता. तो रविवारी रात्री ९ वाजेपासून बेपत्ता होता. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रात्री ९ वाजून २ मिनिटांनी प्रदीप माळी, विजय बेदकर आणि निर्मल वडगुजर हे तिघे दुचाकीवरून जाताना दिसून आले.

माहितीनुसार, २३ मार्च रोजी संशयित चेतन कानडे याने प्रदीपच्या पानटपरीला आग लावली होती. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला होता. याच जुन्या वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी चेतन सुभाष कानडे (रा. पाटील गल्ली) याला ताब्यात घेतले असून, उर्वरित दोन आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे.

टॅटू आणि लग्नपत्रिकेमुळे पटली ओळख

सोमवारी सकाळी सुमारे ७:३० वाजता मृतदेह आढळल्यानंतर सुरुवातीला ओळख पटत नव्हती. मात्र मृतदेहावरील कपडे, हातावरील टॅटू आणि खिशात सापडलेल्या लग्नपत्रिकेमुळे पोलिसांनी ओळख निश्चित केली.

रुग्णालयात नातेवाईक आक्रमक

दरम्यान, घटनेनंतर रुग्णालयात मृताच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली. शवविच्छेदन जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात येणार असून, आरोपींना अटक झाल्याशिवाय अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.