केळी उत्पादकांनी मांडल्या व्यथा; समन्वयातूनच मार्ग – जिल्हाधिकारी रोहन घुगे
केळी उत्पादकांनी मांडल्या व्यथा; समन्वयातूनच मार्ग – जिल्हाधिकारी रोहन घुगे
लेवाजगत न्यूज | रावेर :केळी बाजारभावातील चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत शेतकरी, व्यापारी आणि संबंधित घटकांनी आपल्या अडचणी व व्यथा स्पष्टपणे मांडल्या. यावेळी परस्परांमध्ये समन्वय आणि विश्वासार्हता राखूनच कायमस्वरूपी उपाययोजना शक्य असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी यांनी केले.
रावेर येथील बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बुधवारी दुपारी ही बैठक पार पडली. बैठकीस जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे, फैजपूर प्रांताधिकारी बबनराव काकडे, हर्षदा देसले, तहसीलदार दीपा जेधे, तसेच चे अध्यक्ष यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
चर्चेदरम्यान जि.प.चे माजी सदस्य रमेश पाटील, संचालक पितांबर पाटील, यावलचे सचिव पाटील, हरिश गणवानी, अंकुश कोळी (चांगदेव) आणि योगिराज पाटील यांनीही आपले मत मांडले. कृउबा सभापती प्रल्हाद पाटील यांनी प्रास्ताविक केले.
डॉ. राजेंद्र पाटील यांनी केळी हे नाशवंत पीक असल्यामुळे किमान भावापेक्षा कमी दरात कापणी टाळण्याचे बंधन शेतकऱ्यांवर घालणे व्यवहार्य नसल्याचे स्पष्ट केले. भाजप प्रदेश प्रतिनिधी सुरेश धनके यांनी आंध्र प्रदेशातील केळी व आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे झालेल्या निर्यातबंदीचा परिणाम स्थानिक बाजारावर होत असल्याची व्यथा व्यक्त केली.
जि.प.चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन व महासंघाचे अध्यक्ष भागवत पाटील यांनी केळीच्या रेल्वे वाहतुकीत राजकारण शिरल्याने बाजारात अस्थिरता वाढल्याचे मत मांडले. यावल कृउबाचे नारायण चौधरी यांनी व्यापारातील विश्वासार्हता कमी झाल्याने मोठे व्यापारी बाजारातून बाहेर पडत असून, अनधिकृत व्यापाऱ्यांमुळे अनियमितता वाढल्याचे निदर्शनास आणले.
यावेळी बाजार समितीचे माजी सभापती सचिन पाटील, संचालक जयेश कुयटे आणि केळी निर्यातदार शेतकरी प्रशांत महाजन यांनीही शेतकऱ्यांच्या समस्या मांडत योग्य दर मिळावा, अशी मागणी केली.
#JalgaonAgriculture
#BananaFarmers #APMCRaver #FarmerWelfare #MarketReform #JalgaonCollector #AgriGovernance #BananaPrice #MaharashtraAgriculture

कोणत्याही टिप्पण्या नाहीत