खान्देशी खाद्यसंस्कृतीचा सुगंध डोंबिवलीत दरवळला महावितरणच्या अभियंता अनिता चौधरी यांच्या हस्ते प्रदर्शनाचा शुभारंभ
खान्देशी खाद्यसंस्कृतीचा सुगंध डोंबिवलीत दरवळला
महावितरणच्या अभियंता अनिता चौधरी यांच्या हस्ते प्रदर्शनाचा शुभारंभ
लेवाजगत न्यूज | डोंबिवली :
आजच्या धावपळीच्या युगात फास्ट फूडच्या विळख्यात अडकलेल्या तरुण पिढीला आपल्या समृद्ध पारंपरिक खाद्यसंस्कृतीची ओळख करून देण्यासाठी लेवा पाटीदार समाज महिला मंडळ (ठाणे) यांच्या वतीने डोंबिवली येथील लेवा भवनमध्ये १० ते १३ एप्रिल दरम्यान खान्देशी वाळवण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा शुभारंभ महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता श्रीमती अनिता अमोल चौधरी यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून कुमारी गायत्री ओक यांची उपस्थिती होती.
आजच्या काळात बर्गर, पिझ्झा यांसारख्या फास्ट फूडमुळे लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत लठ्ठपणा, मधुमेह (शुगर) यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, नैसर्गिक धान्यांपासून तयार होणारे पारंपरिक खान्देशी पदार्थ किती पोषक व आरोग्यदायी आहेत, याची प्रचिती या प्रदर्शनातून येत आहे.
उद्घाटनप्रसंगी श्रीमती अनिता चौधरी यांनी सांगितले की, “आजीच्या हातचा घरगुती खाऊ आणि खान्देशी वाळवण हे केवळ चविष्टच नव्हे, तर आरोग्यासाठी अत्यंत हितकारक आहे. फास्ट फूडला फाटा देत पारंपरिक अन्नपदार्थांकडे वळणे ही काळाची गरज आहे. पुढील पिढीला ही सवय लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”
कुमारी गायत्री ओक यांनी आपल्या मनोगतात माणसाचे मातीशी असलेले नाते अधोरेखित केले. गेली २५ वर्षे सातत्याने असे प्रदर्शन भरवून महिला सक्षमीकरणाला चालना देण्याबरोबरच नवउद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य समितीकडून केले जात आहे. खान्देशातील पारंपरिक मेवा शहरात आणून नव्या पिढीला संस्कृतीची ओळख करून देण्याचा हा उपक्रम ठरत आहे.
समितीच्या अध्यक्षा सौ. सायली महाजन यांच्या नेतृत्वाखाली खान्देशातून आलेल्या महिलांनी चार दिवसांसाठी विविध स्टॉल्स उभारले आहेत. या प्रदर्शनात पापड, बिबडे, कुरडई, सांडगे, विविध प्रकारचे तिखट, मसाले, चटण्या यांसह साड्या, बेडशीट आणि इतर आकर्षक घरगुती वस्तूंची मांडणी करण्यात आली आहे.
आरोग्यदायी जीवनशैलीसाठी आणि आपल्या संस्कृतीशी नाळ जपण्यासाठी या प्रदर्शनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी आशा पाटील, भावना वाघोदे, सुनीता नेहेते, संगीता कोलते, धनश्री पाटील, कमल भिरूड, रूपाली वाणी यांच्यासह महिला मंडळाच्या कार्यकारिणीने विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत