दिंडोरीत विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू; संतप्त नागरिकांचा मंत्री नरहरी झिरवळ यांना घेराव
नाशिक : दिंडोरीत विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू; संतप्त नागरिकांचा मंत्री नरहरी झिरवळ यांना घेराव
नाशिक (प्रतिनिधी) : दिंडोरी तालुक्यातील शिवाजीनगर परिसरात मध्यरात्री भीषण दुर्घटना घडून कार विहिरीत कोसळल्याने एकाच कुटुंबातील सहा चिमुकल्यांसह नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून शनिवारी घटनास्थळी भेट देण्यासाठी आलेले अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ यांना स्थानिक नागरिक आणि मृतांच्या नातेवाईकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले.
प्राप्त माहितीनुसार, शिवाजीनगरमधील कॉलनी रस्त्याच्या मध्यभागी असलेली सुमारे ६० फूट खोल विहीर ही या दुर्घटनेचे मुख्य कारण ठरली. या विहिरीभोवती कोणतीही संरक्षक भिंत किंवा सुरक्षित जाळी नसल्याने आणि विहिरीचा कठडा अत्यंत कमी उंचीचा असल्याने रात्री वाहनचालकाला अंदाज न आल्यामुळे कार थेट विहिरीत कोसळली.
स्थानिक नागरिकांनी या धोकादायक विहिरीबाबत वारंवार तक्रारी करूनही दिंडोरी नगरपंचायत आणि जागामालक यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. विहिरीच्या कठड्यापर्यंत रस्ता बांधण्यात आला असून, सुरक्षिततेसाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नव्हती.
यापूर्वीही या विहिरीत पाळीव जनावरे पडण्याच्या घटना घडल्या असल्याचे स्थानिकांनी सांगितले. संबंधित जागामालकाने आपल्या घराभोवती सुरक्षेची उपाययोजना केली, मात्र मोकळ्या जागेतील विहीर असुरक्षितच ठेवली गेल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, घटनास्थळी आलेल्या मंत्री नरहरी झिरवळ यांना संतप्त नागरिकांनी प्रश्नांचा भडिमार केला. “आधीच विहीर सुरक्षित केली असती तर ही दुर्घटना टळली असती,” असा रोष व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीवरही नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
या दुर्घटनेला जबाबदार जागामालक तसेच नगरपंचायतीतील संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. सध्या पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत