पालखी उत्सवातून घराघरात पोहोचणार भगवान परशुराम १८ व १९ एप्रिल रोजी जळगावात भक्तीमय सोहळा; मान्यवरांची उपस्थिती
पालखी उत्सवातून घराघरात पोहोचणार भगवान परशुराम
१८ व १९ एप्रिल रोजी जळगावात भक्तीमय सोहळा; मान्यवरांची उपस्थिती
जळगाव : ब्रह्मश्री बहुउद्देशीय संस्था व सर्व शाखीय ब्राह्मण समाज, जळगाव यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान श्री परशुराम पालखी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. शनिवार दि. १८ एप्रिल व रविवार दि. १९ एप्रिल रोजी हा भव्य सोहळा पार पडणार असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.
या उत्सवाच्या माध्यमातून “घराघरात भगवान परशुराम पोहोचावेत” हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तयारी करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष प्रसाद पटवे गुरुजी यांनी दिली. या सोहळ्यास ह.भ.प. मंगेश जोशी, ह.भ.प. दादा महाराज जोशी, ह.भ.प. मनोज महाराज पिंप्राळेकर, ह.भ.प. देवदत्त मोरदे, तसेच देवेंद्र गढीकर यांचे आशीर्वचन लाभणार आहे.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजूमामा भोळे, महापौर दिपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, नगरसेविका मानसीताई भोईटे, जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, ब्राह्मण सभा अध्यक्ष नितीन कुळकर्णी, तसेच जैन इरिगेशनचे व्ही. एम. भट आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विविध सामाजिक व धार्मिक संस्थांचे पदाधिकारीही या सोहळ्यात सहभागी होणार असून त्यांच्या हस्ते पालखी पूजन केले जाणार आहे.
शनिवार दि. १८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता हनुमान मंदिर (एस.एम.आय.टी. कॉलेज जवळ) येथून पालखी सोहळ्याला सुरुवात होईल. टाळ-मृदुंग, ढोल-ताशा व लेझीम पथकांच्या गजरात निघणारी शोभायात्रा श्री सप्तश्रृंगी देवी मंदिर, प्रेम नगर येथे विसर्जित होईल.
रविवार दि. १९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता श्री सप्तश्रृंगी देवी मंदिर येथे भगवान परशुराम यांच्या मूर्तीला अभिषेक, आरती व पूजन करण्यात येईल. सायंकाळी होणाऱ्या शोभायात्रेत पालखी पुन्हा सामील होणार आहे.
पालखी म्हणजे देवाचे लोकांमध्ये ‘प्रस्थान’ होय. भक्ती, आनंद, एकात्मता आणि संस्कृतीचा संगम घडवणारा हा सोहळा अनुभवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष प्रसाद पटवे व समस्त ब्रह्मश्री परिवार यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत