Contact Banner

रावेरमध्ये नंदकिशोर महाजन यांच्या नावाची विधान परिषदेसाठी जोरदार चर्चा

 

mahadev-hospital-mahatma-jyotirao-phule-health-scheme-free-treatment

रावेरमध्ये नंदकिशोर महाजन यांच्या नावाची विधान परिषदेसाठी जोरदार चर्चा

लेवाजगत न्यूज रावेर : रावेर तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ व प्रभावी नेते नंदकिशोर महाजन यांचे नाव सध्या विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या पक्षनिष्ठा, सर्वसामान्यांशी असलेला मजबूत संपर्क आणि विकासकामांचा धडाका यामुळे त्यांच्या नावाचा विचार पक्षाच्या उच्च पातळीवर सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. या चर्चेमुळे रावेर, यावल आणि मुक्ताईनगर परिसरात कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

तांदलवाडी येथील नंदकिशोर महाजन हे सुरुवातीपासूनच भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. केवळ निवडणुकीपुरते सक्रिय न राहता २४ तास जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहण्याची त्यांची कार्यपद्धती त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवते. शेतकरी, कष्टकरी आणि महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने ठाम भूमिका घेतली आहे. विशेषतः कोरोना काळात त्यांनी गरजूंना धान्य व वैद्यकीय मदत पुरवून जनतेचा विश्वास संपादन केला.

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये आमदार व खासदारांना निवडून देण्यासाठी नंदकिशोर महाजन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जास्तीत जास्त मतदारांना आकर्षित करण्याचे ध्येय त्यांनी त्या काळात ठेवले होते आणि ते यशस्वीपणे साध्यही झाले, अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.

त्यांचा राजकीय प्रवास प्रेरणादायी मानला जातो. रावेर पंचायत समितीचे दोन वेळा सदस्य व सभापती, जिल्हा बँकेचे संचालक तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून त्यांनी विविध पदांवर काम करत आपल्या कार्यक्षमतेची छाप उमटवली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील त्यांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

“नंदकिशोर महाजन यांना संधी मिळाल्यास रावेरसह उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती मिळेल,” अशी भावना स्थानिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये नंदकिशोर महाजन हे विधान परिषदेसाठी एक मजबूत चेहरा ठरू शकतात, अशी चर्चा रंगत आहे. आता पक्षश्रेष्ठी याबाबत काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.