Contact Banner

रावेर–पुणे श्री साईराम ट्रॅव्हल्स बसमधून धूर; प्रवाशांत घबराट

 

raver-pune-sairam-travels-bus-smoke-passenger-panic-incident

 रावेर–पुणे श्री साईराम ट्रॅव्हल्स बसमधून धूर; प्रवाशांत घबराट

रावेर लेवाजगत न्यूज प्रतिनिधी : रावेरहून पुण्याकडे निघालेल्या श्री साईराम ट्रॅव्हल्सच्या बसमधून अचानक धूर निघाल्याने प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. सुदैवाने चालक व कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, रावेर येथून सुमारे ४० प्रवासी घेऊन निघालेल्या (MH 19 Y 9549) या बसच्या ब्रेक लाइनरमध्ये बिघाड झाल्याने छत्रपती संभाजीनगर–अहिल्यानगर मार्गावरील पांढरी फुल घाट परिसरात २३ एप्रिल रोजी पहाटे २.३० वाजता ही घटना घडली. पुण्याकडे जाणाऱ्या एका कार चालकाच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी बस चालकाला सूचना दिली. त्यानंतर चालक व कंडक्टर यांनी तात्काळ बस थांबवून सर्व प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवले.

दरम्यान, बसच्या लाईनरमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच संभाव्य धोका टाळण्यात यश आले. मात्र अचानक उतरावे लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

बस दुरुस्तीसाठी सुमारे तीन तास लागल्याने प्रवाशांचा वेळ वाया गेला. सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांनी संताप व्यक्त करत, झालेल्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित केला.

प्रवाशांनी ट्रॅव्हल्स व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त करत, वाहनांची नियमित तपासणी करणे व आपत्कालीन सुविधा उपलब्ध ठेवणे आवश्यक असल्याची मागणी केली. तसेच, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनानेही कडक नियम लागू करावेत, अशी मागणी करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.