Contact Banner

अवकाळी संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी; रक्षाताई खडसे यांची १९ गावांना भेट

 

ravertalukyat-19-nuksangrast-gavanna-raksha-khadse-bhet

अवकाळी संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी; रक्षाताई खडसे यांची १९ गावांना भेट

रावेर (प्रतिनिधी) : दि. ०२ एप्रिल २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यासह रावेर लोकसभा क्षेत्रात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी रावेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांचा दौरा करून परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.

या दौऱ्यात त्यांनी केऱ्हाळे बु., अहिरवाडी, पाडले खु., पाडले बु., निरूळ, खानापूर, चोरवड, अजनाड, अटवाडे, दोधे, नेहेते, खिरवड, मोरगाव, वाघोड, कर्जोद, भोकरी, तामसवाडी, पातोंडी आणि निंभोरे सिम अशा एकूण १९ गावांना भेट देत नुकसानाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतीच्या नुकसानीची माहिती जाणून घेतली तसेच शासन आणि विमा कंपन्यांकडून सुरू असलेल्या पंचनाम्यांच्या प्रक्रियेबाबत माहिती घेतली.

अवकाळी पावसामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन रक्षाताई खडसे यांनी दिले. त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, या दौऱ्यात त्यांनी काही धार्मिक कार्यक्रमांनाही भेट दिली तसेच गावांमधील दुःखद घटनांतील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

या प्रसंगी स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.