जागतिक आरोग्य दिनानिमित्त नाशिराबाद येथे आरोग्य जनजागृती
जागतिक आरोग्य दिनानिमित्त नाशिराबाद येथे आरोग्य जनजागृती
लेवाजगत न्यूज जळगाव - जागतिक आरोग्य दिन (७ एप्रिल २०२६) निमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव (नॅक मान्यताप्राप्त) कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागाच्या वतीने नाशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आरोग्य जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास मार्गदर्शन करणारे प्राध्यापक प्रो. जेसिन्थ धया, प्रा. निर्भय मोहोड, कु. स्वाती गाडेगोणे, प्रा. अश्लेषा मून, प्रा. डिव्हायाना पवार, प्रा. रितेश पडघण, प्रा. सुमित भारांबे व प्रा. सचिन पवार उपस्थित होते.
यावर्षीच्या जागतिक थीम आरोग्यासाठी एकत्र विज्ञानाच्या पाठीशी उभे रहा या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग कर्मचारी तसेच आशा सेविका यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे व सहकार्यामुळे कार्यक्रम अधिक प्रभावी आणि माहितीपूर्ण ठरला. सुरुवातीला परिसरात आरोग्य जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत नर्सिंग विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्यांद्वारे नागरिकांना आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. आरोग्य संवर्धन, स्वच्छता, रोग प्रतिबंधक उपाययोजना तसेच वैज्ञानिक उपचारपद्धतींचे महत्त्व पटवून देत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी विषयानुरूप नाटिका सादर करत आजच्या काळात उद्भवणार्या विविध आरोग्य समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला. तसेच अंधश्रद्धा टाळून वैज्ञानिक उपचारपद्धतींवर विश्वास ठेवणे, संतुलित आहार, स्वच्छता व नियमित तपासणी यांचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले. उपस्थित नागरिकांनी या नाटिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या उपक्रमामागील प्रमुख उद्दिष्ट म्हणजे समाजामध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे, प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजनांना प्रोत्साहन देणे आणि पुराव्यावर आधारित वैद्यकीय उपचारांबाबत नागरिकांचा विश्वास वाढवणे हे होते. यासोबतच समुदायाचा आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला.संपूर्ण कार्यक्रमात नर्सिंग विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांचा उत्साह, प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि आरोग्य कर्मचार्यांचे सहकार्य यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवर, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका तसेच सहभागी नागरिकांचे आभार मानण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत