Contact Banner

तिरळेपणा तपासणी शिबीरात १५० जणांची मोफत तपासणी; शस्त्रक्रियांना आजपासून सुरुवात

 

tiralepana-tapasni-shibirat-150-jananchi-mofat-tapasni-shastrakriyana-aajpasun-suruvat

तिरळेपणा तपासणी शिबीरात १५० जणांची मोफत तपासणी; शस्त्रक्रियांना आजपासून सुरुवात

जळगाव (लेवाजगत न्यूज) : पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान आणि डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत तिरळेपणा तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पहिल्याच दिवशी तब्बल १५० रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिरात तपासणीसाठी रुग्णांची मोठी गर्दी होत आहे.

राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम व जिल्हा अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आयोजित या १९९व्या तिरळेपणा मोफत शस्त्रक्रिया शिबिरासाठी दि. १ व २ एप्रिल रोजी तपासणी करण्यात आली. दि. ३ एप्रिलपासून शस्त्रक्रियांना सुरुवात झाली असून ५ एप्रिलपर्यंत हा उपक्रम चालणार आहे.

शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. मधुसूदन झंवर, विभागप्रमुख डॉ. एन. एस. आर्विकर, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ. नि.तु. पाटील, डॉ. रेणुका पाटील, डॉ. निखील चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

तिनवेळा ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद असलेले प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. मधुसूदन झंवर हे स्वतः रुग्णांची तपासणी व शस्त्रक्रिया करत असून त्यांच्या सोबत २० डॉक्टरांची तज्ज्ञ टीम सहभागी झाली आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत शिबिराचे कामकाज सुरू आहे.

शिबिरात नोंदणीकृत १५० रुग्णांची तपासणी पूर्ण झाली असून पात्र रुग्णांवर दि. ३ ते ५ एप्रिलदरम्यान मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

जिल्ह्यात प्रथमच असा उपक्रम
जळगाव जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारचे तिरळेपणा तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळत असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.