Contact Banner

सावदा शहरात पवनपुत्र हनुमान जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा; विविध मंदिरांत महापूजा व कार्यक्रम

 

savda-shaharat-pavanputra-hanuman-janmotsav-bhaktimay-vatavaranat-sajra-vividh-mandirat-mahapuja-karyakram

सावदा शहरात पवनपुत्र हनुमान जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा; विविध मंदिरांत महापूजा व कार्यक्रम

सावदा (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) : पवनपुत्र हनुमानाचा जन्मोत्सव सावदा शहरासह परिसरात अत्यंत उत्साह आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील सर्व हनुमान मंदिरे आकर्षक फुलांनी सजविण्यात आली होती. पहाटे ५ ते ६ वाजेदरम्यान हनुमान जन्मोत्सव साजरा होऊन सर्वत्र महाआरती करण्यात आली.

क्रांतीचौक परिसरातील मारुती मंदिरात सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान फैजपूर येथील पुरोहित उदय दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली ९ ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात योगेश महाजन, मोती कुंभार, कुंदन चौधरी, लक्ष्मण जोगी, कृष्णा पाटील व पीयूष भारंबे या सहा दाम्पत्यांनी महारुद्रयाग संपन्न केला. गांधी चौकातील मोठा मारुती मंदिरात पुरोहित चंद्रशेखर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली धनराज महाराज अंजाळेकर यांच्या उपस्थितीत जन्मोत्सव महापूजा पार पडली.

तसेच पाटील पुरा भागातील लहान मारुती मंदिरात राजेंद्र जोशी यांच्या पौरोहित्याखाली देवेंद्र (भाऊ) धांडे यांच्या हस्ते जन्मोत्सव महापूजा करण्यात आली. सकाळी ९ ते १२ या वेळेत सुमारे ३ हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.

टेलिफोन ऑफिस शेजारील पालिका शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसरात सर्व दुकानदारांनी एकत्र येत उत्साहात हनुमान जयंती साजरी केली. या ठिकाणीही दुकानदारांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. याशिवाय शहरातील कोष्टी वाडा, बुधवार पेठ, सोमेश्वर नगर, सुगंगा नगर, निमजाई माता नगर, लक्ष्मीनारायण नगर तसेच ओम कॉलनी या भागांमध्येही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

तसेच श्री स्वामिनारायण मंदिरात हनुमान (कष्टभंजन देव) जन्मोत्सवानिमित्त सकाळी ८ ते १० या वेळेत विशेष पूजा व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हनुमंत रायांची आरती शास्त्री स्वामी विश्वप्रकाशदासजी यांनी केली, तर राजेंद्र जोशी यांनी पौरोहित्य केले. तसेच पुजारी सत्यप्रकाशदासजी यांनी हरिकृष्ण महाराज व राधाकृष्ण देव यांची सकाळी १० वाजता आरती केली. स्वामिनारायण मंदिरात दर महिन्याच्या पौर्णिमेला येणाऱ्या भाविकांप्रमाणे याही वेळी हरिभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

एकूणच सावदा शहरात दिवसभर हनुमान भक्तीचा उत्साह, धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आणि भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.