कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी १० वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; संतप्त नागरिकांची कारवाईची मागणी
कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी १० वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; संतप्त नागरिकांची कारवाईची मागणी
लेवाजगत न्यूज भुसावळ : नारायण नगर परिसरात २४ एप्रिल रोजी शाळेत जात असताना कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या १० वर्षीय तारकेश्वर झोपे या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी संबंधित कुत्र्यांच्या मालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तारकेश्वर झोपे हा सकाळी शाळेसाठी घराबाहेर पडला असताना परिसरातील कुत्र्यांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या चेहऱ्यावर व शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. सुरुवातीला जळगाव येथे उपचार करून नंतर त्याला मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर नारायण नगर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी करत संताप व्यक्त केला. कुत्र्यांचे मालक म्हणून पालिका निवृत्त कर्मचारी प्रकाश कोळी यांचे नाव समोर आले असून, त्यांच्या घरातील पालिकेच्या डॉग व्हॅनद्वारे पाच कुत्र्यांना जप्त करण्यात आले. या कारवाईवेळी पोलीस कर्मचारी तसेच पालिका प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही योग्य ती उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप केला आहे. “लहान मुलांना घराबाहेर पाठवताना भीती वाटते,” अशी भावना परिसरातील महिलांनी व्यक्त केली.
दरम्यान, या प्रकरणात संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच शहरातील भटक्या व पाळीव कुत्र्यांबाबत कठोर नियमांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत