सावदा-भुसावळ परिसरात उष्णतेचा कहर; तापमानाने गाठला उच्चांक
सावदा-भुसावळ परिसरात उष्णतेचा कहर; तापमानाने गाठला उच्चांक
लेवाजगत न्यूज रावेर-तालुक्यासह सावदा-भुसावळ परिसरात उष्णतेची तीव्र लाट कायम असून नागरिकांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. भुसावळ येथे सलग दुसऱ्या दिवशी तापमानाने ४५ अंशांचा टप्पा ओलांडल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
केंद्रीय जल आयोगाच्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १२) भुसावळ येथे मे महिन्यातील उच्चांकी ४५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोमवारी तापमान ४५.२ अंश होते, तर मंगळवारी त्यात आणखी वाढ झाली. त्यामुळे दुपारच्या सुमारास शहरातील रस्ते ओस पडल्याचे चित्र दिसून आले.
तीव्र उष्णतेमुळे नागरिक अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत. दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत शहरात जणू अघोषित संचारबंदी असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. बाजारपेठांमध्ये ग्राहकांची संख्या घटली असून थंड पेये, फळांचे रस व उसाच्या रसाच्या गाड्यांवर मात्र गर्दी वाढताना दिसत आहे.
दरम्यान, रावेर तालुक्यातील सावदा परिसरातही तापमानाचा पारा ४४ अंशांच्या पुढे गेल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. भुसावळ-चितोडगड महामार्गावरील सावदा ते पाल दरम्यानचा रस्ता दुपारच्या वेळी निर्मनुष्य दिसत असून, वाढत्या उष्णतेमुळे वाहनचालकही प्रवास टाळत असल्याचे चित्र आहे. उष्ण वाऱ्यांपासून बचावासाठी नागरिक झाडांचा आसरा घेताना दिसत आहेत.
वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचा, पुरेसे पाणी पिण्याचा व उष्माघातापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत