Contact Banner

अपघातग्रस्त व्यक्तींना त्वरित मदत कशी करावी याबाबत मार्गदर्शन सत्र संपन्न

 

accident-victims-immediate-help-guidance-session-concluded

अपघातग्रस्त व्यक्तींना त्वरित मदत कशी करावी याबाबत मार्गदर्शन सत्र संपन्न

जळगाव जिल्हा पोलीस दल व डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज यांचा संयुक्त उपक्रम

लेवाजगत न्यूज | जळगाव

जळगाव जिल्हा पोलीस दल व डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने अपघातग्रस्त व्यक्तींना त्वरित मदत कशी करावी याबाबत मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. केतकी पाटील सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक नंदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास बावचोळे, संस्थाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, रुग्णालय व्यवस्थापक आशिष भिरूड यांच्यासह विविध तालुक्यांतील पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक व अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमात डॉ. सतीश पी. आणि डॉ. मोहित पाटील यांनी अपघातग्रस्तांना प्रथमोपचार देण्याचे महत्त्व स्पष्ट केले. रुग्णाचा श्वास सुरू राहण्यासाठी आवश्यक उपाय, घटनास्थळी गर्दी न करता योग्य मदत कशी करावी तसेच रुग्णवाहिका येईपर्यंत कोणत्या प्राथमिक उपाययोजना कराव्यात याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पोस्टरच्या माध्यमातून जखमी व्यक्तीला सुरक्षितपणे हाताळणे आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देण्याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.

अपर पोलीस अधीक्षक नंदीप गावित यांनी अपघातानंतरचा पहिला एक तास ‘गोल्डन अवर’ मानला जातो, या काळात तातडीने वैद्यकीय मदत मिळाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात, असे सांगितले. महाराष्ट्रात १०८ ही मोफत आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा २४ तास उपलब्ध असून वाहतूक व आपत्कालीन मदतीसाठी १०३३ आणि वैद्यकीय सेवेसाठी १०८ या हेल्पलाईन क्रमांकांचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी शासनाच्या विविध उपाययोजनांची माहिती देताना मृत्यूंजय दूत योजना, अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या नागरिकांना कायदेशीर संरक्षण, ब्लॅक स्पॉट निरीक्षण आदी उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

सपोनि विशाल पाटील यांनी पीएम राहत योजनेची माहिती देत मृत्यूंजय दूत हे साध्या वेशातील पोलीस असून त्यांच्या माध्यमातून अपघातग्रस्तांना तातडीची मदत पोहोचविण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच पीएम राहत योजनेअंतर्गत रुग्णांना कशी मदत मिळवून देता येईल, याबाबतही माहिती दिली.

डॉ. वैभव पाटील यांनी प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी रुग्णालय कायम तत्पर असल्याचे सांगितले. अपघातग्रस्तांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली. रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. संस्कृती भिरूड, डॉ. ऋचा गौर आणि डॉ. मोहित पाटील यांनी केले. उपस्थितांना फर्स्ट एड बॉक्सचे वितरण करण्यात आले तसेच शंकानिरसन व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचे आयोजनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.