आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना; स्कॉर्पिओ दरीत कोसळून साताऱ्यातील ८ तरुणांचा मृत्यू
आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना; स्कॉर्पिओ दरीत कोसळून साताऱ्यातील ८ तरुणांचा मृत्यू
अलिबाग प्रतिनिधी : पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. दाभिळ गावाजवळ स्कॉर्पिओ गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन थेट खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत सातारा जिल्ह्यातील आठ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून आसगाव गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील १८ ते ३० वयोगटातील तरुण शुक्रवारी कोकणात सहलीसाठी आले होते. दापोलीतील हर्णे येथे दोन दिवस सहलीचा आनंद घेतल्यानंतर रविवारी पहाटे ते परतीच्या प्रवासाला निघाले होते. मात्र आंबेनळी घाटातील दाभिळ गावाजवळ आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि स्कॉर्पिओ सुमारे ७०० ते ८०० फूट खोल दरीत कोसळली.
अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. गाडीत असलेल्या सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्रीचा अंधार आणि दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे मदत व बचाव कार्यात मोठ्या अडचणी येत होत्या.
प्राथमिक माहितीनुसार मृतांमध्ये महेश अनिल पवार (२५), आदित्य अशोक साळुंखे (२१), रितेश राजेंद्र लोखंडे (२५), सुहास जितेंद्र लोखंडे (२०), अंश समीर चव्हाण (१८), उत्कर्ष आनंद शिंगटे (२१), अनिल अभिमन्यू शिंगटे (२५) आणि नितीन किसन नायकोंडे (३५) यांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, तहसीलदार कपिल घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्यासह विविध बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. सह्याद्री ट्रकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स, महाड येथील सिस्केप संस्था तसेच पोलादपूरमधील स्थानिक बचाव पथकांनी रात्रीच दरीत उतरून शोधमोहीम सुरू केली. दोरीच्या साहाय्याने स्ट्रेचर बांधून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
सहलीचा आनंद क्षणात दुःखात
कोकण सहलीसाठी गेलेले हे सर्व तरुण अत्यंत उत्साहात होते. दोन दिवस पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर ते रविवारी पहाटे परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र नियतीने वेगळेच काही ठरवले होते. पहाटेच्या सुमारास वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी खोल दरीत कोसळली. एका क्षणात आनंदी सहल दुःखद दुर्घटनेत बदलली. या घटनेमुळे आसगाव गावावर शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत