Contact Banner

केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन

 केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन


जळगाव दि.  25 मे  :- केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले सादर करणे आवश्यक असल्याचे आवाहन तहसीलदार रुपाली काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.


केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना यांचा समावेश असून, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. ७ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांनाही हयातीचे दाखले सादर करणे आवश्यक आहे.


लाभार्थ्यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये सत्यापन अॅप उपलब्ध असल्यास त्याद्वारे अथवा नातेवाईकांच्या मदतीने हयात प्रमाणपत्र (डिजिटल लाईफ सर्टिफिकेट) ऑनलाइन पद्धतीने प्राप्त करून ते संजय गांधी योजना कार्यालय, न.पा. क्षेत्र, रेल्वे स्टेशन रोड, जळगाव येथे जमा करावे. तसेच ग्राम महसूल अधिकारी, कार्यालयातील संगणक परिचालक कर्मचारी किंवा जवळील आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातूनही हे प्रमाणपत्र मिळविता येणार आहे.


शासनाकडून “बेनिफिशियरी सत्यापन अॅप” उपलब्ध करून देण्यात आले असून, ते मोबाईलमध्ये डाउनलोड करून लाभार्थ्यांचा फोटो घेऊन हयातीचा दाखला ऑनलाइन सबमिट करता येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने दाखला सादर केल्यानंतर त्याची प्रत संजय गांधी योजना कार्यालयात जमा करण्याचे आवाहनही प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.