Contact Banner

४२ व्या वर्षी घरात चिमुकलीचा जन्म, पण दोन महिन्यांतच नियतीचा घाला; गावदेवी मार्केट आगीत पित्याचा दुर्दैवी अंत


baby-born-at-42-tragic-death-father-dies-in-gaodevi-market-fire


 ४२ व्या वर्षी घरात चिमुकलीचा जन्म, पण दोन महिन्यांतच नियतीचा घाला; गावदेवी मार्केट आगीत पित्याचा दुर्दैवी अंत

लेवाजगत न्यूज ठाणे : ठाण्यातील नौपाडा परिसरातील गोखले रोडवरील गावदेवी भाजी मार्केट इमारतीला गुरुवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलातील ४२ वर्षीय केंद्र अधिकारी सागर शिंदे आणि प्रभाग समिती कार्यालयात कार्यरत ५५ वर्षीय सुरक्षारक्षक काळू गाडेकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.


lewajagat.com


या घटनेमुळे संपूर्ण ठाणे शहरात शोककळा पसरली असून, कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या सागर शिंदे यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे ४२ व्या वर्षी त्यांच्या घरी कन्यारत्नाचा जन्म झाला होता. अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच घरात आनंदाचे वातावरण असताना नियतीने घाला घातला आणि दोन महिन्यांच्या चिमुकलीच्या डोक्यावरचे पितृछत्र कायमचे हरपले.

ठाण्यातील बाळकुम परिसरातील हायलॅण्ड गृहसंकुलात शिंदे कुटुंब वास्तव्यास होते. सागर शिंदे हे पाचपाखाडी येथील अग्निशमन केंद्रात कार्यरत होते. कर्तव्य बजावत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई जयश्री, पत्नी माधुरी आणि दोन महिन्यांची मुलगी असा परिवार आहे.

शिंदे यांचे पार्थिव नितीन कंपनी येथील अग्निशमन केंद्रात आणण्यात आले. येथे लोकप्रतिनिधी, अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना भावपूर्ण मानवंदना दिली. महापौर शर्मिला पिंपळोलकर, आमदार जितेंद्र आव्हाड, माधवी नाईक, महापालिका आयुक्त सौरभराव, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी शिंदे यांच्या आई व पत्नीचे सांत्वन करण्यात आले.

दरम्यान, सुरक्षारक्षक काळू शंकर गाडेकर यांचे पार्थिव शवविच्छेदनानंतर त्यांच्या मूळ गावी गाडेकरवाडी, गंगापूर, आंबेगाव, जिल्हा पुणे येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

या दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या निष्काळजीपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांनी अतिक्रमणे, मार्केट परिसरातील बेकायदा फेरीवाल्यांचा प्रवेशद्वारांवर कब्जा तसेच स्थावर मालमत्ता विभागाच्या संगनमताने उभारण्यात आलेल्या बेकायदा टपऱ्यांमुळे ही दुर्घटना घडल्याचा गंभीर आरोप केला आहे.

फळे व भाजीपाला विक्रीसाठी असलेल्या या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कपड्यांची दुकाने थाटण्यात आली होती. काही समाजकंटकांकडून परिसरात दहशत निर्माण केली जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. प्रवेशद्वारांवर बेकायदा फेरीवाल्यांनी कब्जा केला होता. तसेच मार्केटच्या दोन्ही बाजूंना उभारण्यात आलेल्या टपऱ्यांमुळे अग्निशमन दलालाही अडथळे निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकाराविरोधात सातत्याने महापालिका आणि स्थावर मालमत्ता विभागाचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळेच ही भीषण दुर्घटना घडल्याचा आरोप वाघुले यांनी केला आहे. मार्केटमधील मूळ विक्रेते अतिक्रमणांमुळे त्रस्त झाले होते. तसेच बेकायदा विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात सामान साठवले जात असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या होत्या.

विशेष म्हणजे, २५ मार्च २०२६ रोजीच संभाव्य आगीचा धोका लक्षात आणून देत लेखी तक्रार करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही कोणतीही प्रभावी कारवाई करण्यात आली नाही. मार्केटच्या चार बाजूंपैकी दोन बाजू दुकानांमुळे पूर्णपणे बंद झाल्या होत्या, तर उर्वरित बाजूंवर केवळ लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या होत्या. त्यामुळे हवा खेळती राहत नव्हती. परिणामी आग धुमसत राहून तिने रौद्र रूप धारण केल्याचे वाघुले यांनी सांगितले.

फेरीवाल्यांना टपऱ्यांची मंजुरी

गावदेवी मार्केटचे पुनर्वसन झाल्यानंतर सर्व १५५ गाळेधारकांना जागा देण्यात आली होती. असे असतानाही महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने फेरीवाला पावत्यांच्या आधारे तीन फेरीवाल्यांना जागा मंजूर केली. त्यानंतर टपऱ्यांनाही परवानगी देण्यात आली. रातोरात दोन टपऱ्या उभारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, वाघुले यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर प्रशासनाने संबंधित अतिक्रमणे हटवली होती.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.