Contact Banner

आकाशाला गवसणी घालणारा भुसावळचा युवा संशोधक इंजिनिअरिंग शिक्षण घेत असतानाच नेत्रज चौधरीने स्वतः तयार केला अत्याधुनिक ड्रोन कॅमेरा

 

bhusawal-young-researcher-netraj-chaudhari-developed-advanced-drone-camera


आकाशाला गवसणी घालणारा भुसावळचा युवा संशोधक इंजिनिअरिंग शिक्षण घेत असतानाच नेत्रज चौधरीने स्वतः तयार केला अत्याधुनिक ड्रोन कॅमेरा


लेवाजगत न्यूज भुसावळ : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात युवकांनी संशोधन व नवकल्पनांच्या माध्यमातून नवनवे प्रयोग करीत देशाचे नाव उज्ज्वल करण्याची परंपरा पुढे चालवली आहे. याच पार्श्वभूमीवर विवरे बुद्रुक तालुका रावेर येथील रहिवासी सेवानिवृत्त मुख्याध्यापक जगन्नाथ तुकाराम चौधरी व सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ कमल नामदेव राणे यांचा नातू व  भुसावळ येथील पुंडलिक गणपत  बऱ्हाटे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी.जे चौधरी सर यांचे चिरंजीव  युवा विद्यार्थी नेत्रज प्रशांत चौधरी याने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाच स्वतःच्या कल्पकतेतून आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर अत्याधुनिक ड्रोन कॅमेरा तयार करून एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे.


नेत्रज चौधरी याने विविध तांत्रिक साहित्य संकलित करून अथक परिश्रमांतून हा ड्रोन विकसित केला आहे. या ड्रोनचे वैशिष्ट्य म्हणजे तो अत्यंत गतिमान पद्धतीने आकाशात झेप घेत पृथ्वीवरील परिसराचे उत्कृष्ट छायाचित्रीकरण करू शकतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून तयार करण्यात आलेला हा ड्रोन शेती क्षेत्रातील देखरेख, कृषी फवारणी, आपत्ती व्यवस्थापन तसेच पार्सल डिलिव्हरी यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये उपयुक्त ठरणार असल्याचे सांगण्यात आले.


या ड्रोन कॅमेऱ्याचे विशेष प्रात्यक्षिक नुकतेच भुसावळ येथे नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. ड्रोनने केलेली आकाशातील भरारी आणि अचूक कार्यप्रणाली पाहून उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केले.


नेत्रज चौधरी याला भविष्यात अधिक प्रगत आणि युद्धभूमीवर उपयोगी पडणारे ड्रोन विकसित करण्याची महत्त्वाकांक्षा असून तो स्वतः तंत्रज्ञानातील विविध जटिल उपकरणे तयार करण्याचे कार्य करीत आहे. जागतिक स्तरावर युद्धामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता भारतीय युवकांनीही या क्षेत्रात पुढे यावे, अशी त्याची भूमिका आहे.


या प्रसंगी जळगाव जिल्हा ज्युनिअर कॉलेज संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. सुनील गरुड, प्रा. शैलेश राणे प्रा. मिलिंद पाटील, भुसावळ माध्यमिक पतपेढीचे संचालक शैलेंद्र महाजन, सुनिल इंगळे टॅक्स कन्सल्टंटन्ट ,अवनीश शैलेश राणे, मानस दिपक राणे आदी मान्यवर उपस्थित होते.


नेत्रज चौधरी यांच्या नाविन्यपूर्ण संशोधनाचे आमदार सत्यजित दादा तांबे यांनी विशेष कौतुक करत, “भविष्यात हा विद्यार्थी अवकाश आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठा शास्त्रज्ञ होईल,” असा विश्वास व्यक्त केला.


भुसावळच्या या युवा संशोधकाच्या यशामुळे परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, युवकांसाठी नेत्रज चौधरी प्रेरणास्थान ठरत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.