चिनावल येथील दाम्पत्य बेपत्ता; मुलाचा आर्त शोध सुरू
चिनावल येथील दाम्पत्य बेपत्ता; मुलाचा आर्त शोध सुरू
कर्जबाजारीपणा, मानसिक तणाव की कौटुंबिक चिंता? पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र
लेवाजगत न्यूज सावदा तालुका रावेर-
सावदा परिसरातील चिनावल येथील एक दाम्पत्य अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अनिल नेमाडे (वय ५७) व भारती अनिल नेमाडे (वय ४६) हे दाम्पत्य १६ मे रोजी सकाळी घरातून कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडले असून त्यानंतर त्यांचा कोणताही संपर्क झालेला नाही.
या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. मुलगा टेकचंद नेमाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आई-वडील अचानक घर सोडून गेल्याने संपूर्ण कुटुंब हादरले आहे. नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध ठिकाणी शोधमोहीम राबवूनही अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.
दरम्यान, या घटनेमागे नेमके कारण काय असावे याबाबत परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. आर्थिक अडचणी, वाढता कर्जाचा ताण, मानसिक तणाव, कौटुंबिक चिंता किंवा इतर काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी घर सोडले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
अनिल नेमाडे यांचा वर्ण निमगोरा असून उंच बांधा, चेहऱ्यावर टक्कल आणि दुखापतीमुळे एक हात थोडासा वाकलेला असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर भारती नेमाडे या मध्यम बांध्याच्या असून काळे-पांढरे केस, गळ्यात मंगळसूत्र व साधा पेहराव अशी त्यांची ओळख सांगण्यात आली आहे.
सावदा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, संबंधित दाम्पत्य कुठेही आढळल्यास तात्काळ सावदा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी विनोद पाटील व रवींद्र महाजन करीत आहेत. दरम्यान, दाम्पत्य सुखरूप परत यावे, अशी भावनिक प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत