Contact Banner

चारधाम यात्रेदरम्यान चोपड्यातील प्रतिभा बोरोले यांचे निधन; रक्षा खडसे यांच्या पुढाकाराने पार्थिव मुंबईत आणण्याची व्यवस्था

 


चारधाम यात्रेदरम्यान चोपड्यातील प्रतिभा बोरोले यांचे निधन; रक्षा खडसे यांच्या पुढाकाराने पार्थिव मुंबईत आणण्याची व्यवस्था

लेवाजगत न्यूज चोपडा (जि. जळगाव) : जिल्ह्यातील चोपडा येथील ५९ वर्षीय प्रतिभा नारायण बोरोले यांचे उत्तराखंड राज्यातील चारधाम यात्रेदरम्यान निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली. बद्रीनाथ दर्शनाच्या आदल्या दिवशी त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान १ मे रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

चोपड्यातील पंकज नगर परिसरातील रहिवासी प्रतिभा बोरोले या १६ भाविकांच्या गटासोबत चारधाम यात्रेसाठी गेल्या होत्या. यात्रेदरम्यान त्यांनी यमुनोत्री, गंगोत्री आणि केदारनाथ या पवित्र स्थळांचे दर्शन घेतले होते. शेवटच्या टप्प्यात बद्रीनाथ येथे दर्शनासाठी जाण्याचे नियोजन असताना अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. डोंगराळ भागातील कमी ऑक्सिजनमुळे त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याची माहिती सहप्रवाशांनी दिली.

प्रकृती गंभीर झाल्यानंतर सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने केदारनाथ परिसरातून खाली आणून चमोली जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी ऑक्सिजन सपोर्टसह उपचार सुरू केले, मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने १ मे रोजी सकाळी सुमारे आठ वाजता त्यांचे निधन झाले.

घटनेची माहिती चोपड्यात पोहोचताच शहरात शोककळा पसरली. धार्मिक यात्रेदरम्यान घडलेल्या या घटनेबद्दल नागरिकांनी हळहळ व्यक्त केली असून विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी बोरोले कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या.

दरम्यान, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालून संबंधित प्रशासनाशी संपर्क साधला. त्यांच्या प्रयत्नांमुळे आवश्यक कागदपत्रे आणि वैद्यकीय औपचारिकता जलदगतीने पूर्ण करण्यात आल्या असून पार्थिव मुंबईपर्यंत आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रतिभा बोरोले या चोपड्याचे माजी नगरसेवक नारायण बोरोले यांच्या पत्नी तसेच पंकज समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले यांच्या वहिनी आणि उपनगराध्यक्ष पंकज बोरोले यांच्या काकू होत. धार्मिक व सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेणाऱ्या आणि कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य म्हणून सर्वांना एकत्र ठेवणाऱ्या व्यक्तिमत्त्वामुळे त्या परिसरात परिचित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.