Contact Banner

शेतकऱ्यांच्या हक्काच्या विजेवर घाला घालू नका; अन्यथा तीव्र आंदोलन उभारू – धनंजय चौधरी

 

do-not-cut-farmers-rightful-electricity-otherwise-intense-protest-dhananjay-chaudhari

शेतकऱ्यांच्या हक्काच्या विजेवर घाला घालू नका; अन्यथा तीव्र आंदोलन उभारू – धनंजय चौधरी

लेवाजगत न्यूज सावदा-जळगाव जिल्ह्यात एमएसईबीकडून जंगल फिडरवरील रात्रीच्या वीजपुरवठ्यात करण्यात आलेल्या दोन तासांच्या कपातीविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी (पूर्व) अध्यक्ष धनंजय चौधरी यांनी शासन व महावितरण प्रशासनाला इशारा देत, “शेतकऱ्यांच्या हक्काच्या विजेवर घाला घालू नका, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा दिला आहे.

do-not-cut-farmers-rightful-electricity-otherwise-intense-protest-dhananjay-chaudhari


यापूर्वी शेतकऱ्यांना रात्री आठ तास नियमित वीजपुरवठा केला जात होता. मात्र वाढत्या उन्हामुळे वीजेचा वापर वाढल्याचे कारण देत आता दोन तासांची कपात करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयामुळे विशेषतः जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा आणि मुक्ताईनगर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.

सध्या केळी बागांची कापणी आणि नवीन लागवडीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. अशा परिस्थितीत शेतीसाठी पाणी अत्यावश्यक असून विजेशिवाय सिंचन व्यवस्था ठप्प होते. त्यामुळे रात्रीच्या वीजपुरवठ्यातील कपात ही शेतकऱ्यांवर अन्याय करणारी असल्याची भावना व्यक्त होत आहे.

आधीच पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, खतांची महागाई, उत्पादन खर्चातील वाढ आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. त्यातच शेतीसाठी लागणाऱ्या विजेमध्ये कपात झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचे धनंजय चौधरी यांनी म्हटले आहे.

शासनाने आणि एमएसईबी प्रशासनाने तात्काळ हा निर्णय मागे घेऊन पूर्ववत आठ तास नियमित वीजपुरवठा सुरू करावा, अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.