वादळात अडकले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर; प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
वादळात अडकले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर; प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
लेवाजगत न्यूज मुंबई : उपमुख्यमंत्री यांच्या हेलिकॉप्टरचा मोठा अपघात टळल्याची माहिती समोर आली आहे. महालक्ष्मी रेसकोर्स येथून कल्याण-मुरबाड परिसरातील एका विवाह सोहळ्यासाठी जात असताना त्यांचे हेलिकॉप्टर अचानक आलेल्या जोरदार वादळात अडकले. मात्र वैमानिकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरबाड परिसरात खराब हवामान, मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळी वाऱ्यामुळे हेलिकॉप्टरच्या उड्डाणात अडथळे निर्माण झाले. बापगाव येथील हेलिपॅडवर उतरण्याची तयारी सुरू असतानाच वावटळीमुळे दृश्यमानता कमी झाली. परिस्थितीचा अंदाज घेत सुरक्षेच्या कारणास्तव हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईतील जुहू विमानतळाकडे वळवण्यात आले.
यानंतर हेलिकॉप्टरचे जुहू येथील हेलिपॅडवर तातडीने आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सुदैवाने, या घटनेत उपमुख्यमंत्री शिंदे, त्यांच्यासोबत असलेले अधिकारी आणि कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, कल्याण-डोंबिवली परिसरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे धुळीचे लोट पसरले होते. अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याच्या तसेच काही ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. हवामान विभागानेही राज्यातील विविध भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत