अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या मेंदूतील रक्ताची गाठ काढून डॉक्टरांनी वाचवले प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ज्ञांचे यश
अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या मेंदूतील रक्ताची गाठ काढून डॉक्टरांनी वाचवले प्राण
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ज्ञांचे यश
लेवाजगत न्यूज जळगाव : वेळेवर निदान, तातडीची शस्त्रक्रिया आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे अपघातग्रस्त शेतकऱ्याचे प्राण वाचल्याची हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे.
यावल तालुक्यातील शंकर महाजन (वय ५५) हे शेतातून घरी परतत असताना बैलगाडीवरून पडल्याने गंभीर जखमी झाले. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार बसून ते बेशुद्ध झाले. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात दाखल होताच मेंदू व मणका विकार तज्ज्ञ डॉ. विपूल राठोड यांनी प्राथमिक तपासणी करून तातडीने सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. तपासणीत मेंदूमध्ये रक्ताची गाठ तयार झाल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय भाषेत या स्थितीला “एक्स्ट्रा ड्युरल हिमॅटोमा” असे म्हटले जाते आणि ती जीवघेणी ठरू शकते.
मेंदूवर दाब वाढत असल्याने डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. डॉ. विपूल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मयूर बर्हाटे, डॉ. श्रृती खंडागळे, डॉ. प्रितम दास, डॉ. शार्दुल, डॉ. कोमेश नेमाडे तसेच भूलतज्ज्ञ डॉ. शितल फेगडे व डॉ. मारीया यांच्या टीमने ‘क्रेनिओटोमी’ ही जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. सुमारे दोन तास चाललेल्या या शस्त्रक्रियेदरम्यान मेंदूमधील रक्ताची गाठ काढून रक्तस्त्राव थांबवण्यात डॉक्टरांना यश आले.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. काही काळ व्हेंटिलेटरवर उपचार सुरू ठेवून डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले. हळूहळू प्रकृतीत सुधारणा होत गेली आणि काही दिवसांनी शंकर महाजन यांना शुद्ध आली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे ही संपूर्ण शस्त्रक्रिया महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत करण्यात आली.
“अपघातानंतरच्या ‘गोल्डन अवर्स’मध्ये रुग्णाला रुग्णालयात आणण्यात आल्यामुळे तातडीने निदान करून शस्त्रक्रिया करता आली. एक्स्ट्रा ड्युरल हिमॅटोमा ही गंभीर अवस्था असली तरी योग्य वेळी उपचार मिळाल्यास रुग्णाचे प्राण वाचवणे शक्य होते. तज्ज्ञ डॉक्टरांचे कौशल्य आणि वेळेवर घेतलेला निर्णय यामुळेच शंकर महाजन यांना नवजीवन मिळाले.”
— डॉ. श्रृती खंडागळे, डॉ. उल्हास पाटील रुग्णालय.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत