Contact Banner

इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये सन २०२६-२२७ या शैक्षणिक वर्षांमध्ये इ. 1 ली च्या वर्गात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन


english-medium-residential-schools-class-1-admission-2026-27-application-invite


 इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये सन २०२६-२२७ या शैक्षणिक वर्षांमध्ये इ. 1 ली च्या वर्गात प्रवेशासाठी अर्ज  करण्याचे आवाहन


लेवाजगत न्यूज जळगाव, दि. 06 -: महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने नामांकित इंग्रजी माध्यम निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्याची योजना सन २००९-१० पासून राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.


एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील पात्र अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांनी दिनांक २ जून २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केले आहे.


या योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अनुसूचित जमातीचा असणे आवश्यक असून संबंधित जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत असावे (सन २०२५-२६ चा तहसीलदार यांचा दाखला आवश्यक). तसेच पालक शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नसावेत.


इयत्ता पहिलीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय ३१ डिसेंबर २०२६ रोजी किमान ६ वर्ष पूर्ण झालेले असावे. विद्यार्थ्यांचा जन्म जुलै २०१९ ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान झालेला असावा. अर्जासोबत जन्मदाखला, आधार कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील विद्यार्थ्यांनी संबंधित यादीतील अनुक्रमांक नमूद करावा. अनाथ, दिव्यांग किंवा विशेष परिस्थितीतील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक दाखले सादर करणे आवश्यक राहील.


प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असून उपलब्ध जागांच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल. केवळ अर्ज केल्याने प्रवेशाची हमी दिली जाणार नाही. तसेच निवड झाल्यानंतर शाळा बदलता येणार नाही.


अर्ज दिनांक ११ मे २०२६ पासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग आवार, चोपडा रोड, यावल येथे उपलब्ध असून ते कार्यालयीन वेळेत जमा करावेत. अंतिम मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, तसेच अपूर्ण अर्ज बाद करण्यात येतील.


इच्छुक पालकांनी अर्ज प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांचा जन्मदाखला व आधार कार्ड घेऊन संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.