आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पाठपुराव्याने रावेर मतदारसंघातील शेतकऱ्यांना पुन्हा ८ तास वीजपुरवठा
आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पाठपुराव्याने रावेर मतदारसंघातील शेतकऱ्यांना पुन्हा ८ तास वीजपुरवठा
लेवाजगत न्यूज प्रतिनिधी रावेर-सावदा महावितरण कंपनीने कृषी पंपाच्या वीजपुरवठ्यात कपात करून तो ८ तासांवरून ६ तास करण्याचा घेतलेला शेतकरी विरोधी निर्णय अखेर मागे घ्यावा लागला आहे. रावेर मतदारसंघाचे आमदार अमोलभाऊ जावळे यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी थेट मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिल्यानंतर महावितरण प्रशासनाने तातडीने नमती भूमिका घेतली असून शेतकऱ्यांना पूर्ववत ८ तास सलग वीजपुरवठा देण्याचे मान्य केले आहे.
राज्यात आजवर शेतीपंपासाठी २४ तासांपैकी ८ तास वीज पुरवली जात होती. मात्र, महावितरणच्या एका जाचक धोरणामुळे हा पुरवठा ६ तासांवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जळगाव जिल्ह्यात सध्या प्रचंड तापमान आणि उष्णतेची लाट असून, जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या केळीचे हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याअभावी धोक्यात आले होते. आधीच अस्मानी संकटात सापडलेला शेतकरी महावितरणच्या या निर्णयामुळे आणखी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असता. वाढत्या उष्णतेमुळे केळी पिकाच्या उत्पादनावर व गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली होती.
ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आमदार अमोलभाऊ जावळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. रावेर मतदारसंघातील शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी पूर्ववत ८ तास नियमित व अखंडित वीजपुरवठा मिळावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली होती.
आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे महावितरण प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आणि मुख्य अभियंत्यांनी या तक्रारीची तातडीने दखल घेतली. शेतीपंपासाठी वीज पुरवठा हा पूर्वीप्रमाणे ८ तासच देण्यात येईल आणि याकरिता तातडीने वीज पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन मुख्य अभियंत्यांनी दूरध्वनीवरून दिले. तसेच वीज पुरवठा खंडित होणार नाही याचीही खबरदारी घेण्याचे प्रशासनाने मान्य केले आहे.
आमदार अमोलभाऊ जावळे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे रावेर मतदारसंघातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी बांधवांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत