लॉजिंगमध्ये तरुण व्यापाऱ्याचा मृतदेह; महिनाभरापूर्वीच झाला होता साखरपुडा नातेवाइकांचा घातपाताचा संशय; संतप्त जमावाने मृतदेह थेट पोलीस ठाण्यात नेला
लॉजिंगमध्ये तरुण व्यापाऱ्याचा मृतदेह; महिनाभरापूर्वीच झाला होता साखरपुडा
नातेवाइकांचा घातपाताचा संशय; संतप्त जमावाने मृतदेह थेट पोलीस ठाण्यात नेला
लेवाजगत न्यूज | पाचोरा
पाचोरा शहरातील जळगाव रोडवरील एका लॉजिंगमध्ये २५ वर्षीय तरुण व्यापाऱ्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. रवींद्र संजय मोरे (वय २५) असे मृत तरुणाचे नाव असून, तो पाचोरा शहरात रेडिमेड कपड्यांचे दुकान चालवत होता. तरुण आणि उमदा व्यापारी म्हणून ओळख असलेल्या रवींद्रच्या मृत्यूमुळे व्यापारी वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
लॉजिंगमध्ये रवींद्रने गळफास घेतल्याचे समोर आल्यानंतर त्याला तातडीने खाली उतरवून उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
घातपाताचा संशय
घटनेची माहिती मिळताच रवींद्रच्या नातेवाइकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. “रवींद्र असा टोकाचा निर्णय घेऊ शकत नाही, त्याचा घातपात झाला असावा,” असा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला. या घटनेनंतर संतप्त नातेवाइक व नागरिकांनी ग्रामीण रुग्णालय तसेच पाचोरा पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, संतप्त नातेवाइकांनी रवींद्रचा मृतदेह थेट पोलीस ठाण्यात आणत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
महिनाभरापूर्वीच झाला होता साखरपुडा
या घटनेतील सर्वात वेदनादायी बाब म्हणजे रवींद्र मोरे याचा अवघ्या महिनाभरापूर्वीच थाटामाटात साखरपुडा झाला होता. घरात लग्नाची तयारी आणि आनंदाचे वातावरण सुरू असतानाच अचानक घडलेल्या या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
रवींद्रने आत्महत्या केली की या प्रकरणामागे अन्य काही कारण आहे, याबाबत शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत